लोणीकंद पोलिसांच्या चौकशीनंतर प्रकार : वाढत्या चोऱ्या, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कार्यवाही
वाघोली- वाडेबोल्हाई व केसनंद रोड परिसरामध्ये वाढत्या दगडफेकी, चोरीचे प्रकार, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणीकंद पोलीसांनी वाडेबोल्हाई-राहू रोडवरील झोपड्यांमध्ये चौकशी करून समज दिली. अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या संशयित 50 झोपड्या दोन दिवसांतच गायब झाल्या. झोपडट्टीतील संशयित रहिवाशांबाबत वाडेबोल्हाईतील ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेबोल्हाई गावातील वाढत्या दगडफेकी, चोरी व इतर चोरीच्या गुन्ह्यामुळे वाडेबोल्हाई गावचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाडेबोल्हाई – राहू रोडवर अमोल ठोंबरे यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत झोपड्या टाकून बरेच लोक राहत आहेत.
या लोकांना बऱ्याचवेळा जागा खाली करा, असे सांगूनही ते ऐकत नाहीत, असे जागा मालक व ग्रामस्थांनी लोणीकंद पोलिसांना कळविले होते. यानुसार पेट्रोलिंग कामी हजर असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांनी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या आदेशाने या ठिकाणी जावून खात्री केली. पोलीस पाटील सुषमा चौधरी, धर्मेंद्र गावडे, दर्शन चौधरी, जमिनीचे मालक अमोल ठोंबरे व इतर ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणच्या लोकांकडे चौकशी केली. ते गावोगावी हिंडून डोंबारी खेळ, नृत्य सादरीकरण, जादूचे कार्यक्रम, साहसी खेळ करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याबाबत माहिती मिळाली. 50 झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
या लोकांवर अंकुश बसावा तसेच त्यांनी कोणताही गुन्हा करू नये म्हणून त्यांचा चौकशी फॉर्म भरून घेऊन त्यांना समज देण्यात आली. त्यांची माहिती त्यांनी दिलेल्या मूळ पत्त्यावरील पोलीस स्टेशनला पाठवून त्यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा अभिलेख मागवून घेतला आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर 50 झोपड्या दोन दिवसांतच खाली झाल्याने जागा मालक ठोंबरे व ग्रामस्थांनी लोणीकंद पोलिसांचे आभार मानले.