मुंबई: करोनाबाधितामुळं वाढणारी रुग्णांची संख्या आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या भीतीचा मोठा फटका महापालिका रुग्णालयांतील आरोग्य सेवेला बसत आहे. कूपर रुग्णालयातील एका संशयित करोना रुग्णाला तब्बल 22 तास मृतदेहांच्या शेजारी बसून काढावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कोविड पॉझिटिव्ह वा संशयित असलेल्या रुग्णाचा मृतदेह दोन तासांच्या आत गुंडाळून ठेवणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, कूपर हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन करोना संशयितांचे व अपघात वॉर्डमध्ये दोघांचे मृतदेह अनेक तास असेच पडून होते. आयसोलेशन वॉर्डमधील संशयित करोनाग्रस्तानं वारंवार विनंती करूनही रुग्णालयातील कुठलाही कर्मचारी मृतदेहांना हात लावण्यास तयार नव्हता. त्यामुळं संबंधित रुग्णाला या मृतदेहांसोबत भीतीच्या छायेत रात्री काढावी लागली.
अखेर आयसोलेशन वॉर्डमधील फोटो आणि व्हिडिओ त्यानं आपल्या जवळच्या लोकांना पाठवले. त्यापैकी एकानं स्थानिक राजकीय नेत्याशी संपर्क साधला आणि त्याला परिस्थितीची कल्पना दिली. या नेत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मृतदेह हलवण्यात आले.