बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांच्यावर बीड (Beed) जिल्ह्यातल्या होळजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. वैजनाथ वाघमारे हे आपल्या पुतण्यासोबत होळवरुन आडसकडे जात होते. त्यावेळी काही अज्ञात वैजनाथ वाघमारे यांच्या कारच्या समोर आले. काही बोलण्याच्या आत दगडफेक सुरु केल्याचे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे.
वैजनाथ वाघमारे यांचा पुतण्या या दगफेकीत जखमी झाला आहे. यात वैजनाथ वाघमारे हे दगडफेकीत थोडक्याच बचावले आहेत. दरम्यान, यापूर्वी आपण अनेक वेळा पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र पोलीस संरक्षण न दिल्यामुळे हा हल्ला झाल्याचे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. या हल्ल्या संदर्भात वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे तक्रार देण्यासाठी सध्या केस तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.
या हल्ल्यानंतर वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांनी,”माझ्यावरील हल्ल्याने आमचं कुटुंब हादरुन गेलं आहे. आमच्या जीवाला धोका आहे. हल्लेखोर कोण माहीत नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावीच, अशी मागणी वाघमारे यांनी केली.
तसंच आपल्यासह कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी मी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु वारंवार मागणी करुनही सुरक्षा देण्यात आली नाही, अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. आज मला सुरक्षा असती तर हा हल्लाच झाला नसता, असेही त्यांनी म्हटले.