मुंबई – सोमवार रात्री ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. ठाण्यातील कासारवडवली या भागात सदर प्रकार घडला. सध्या रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे, तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या 15 ते 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर, रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेतली आहे. रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या या प्रकरणावरून राज्यातील राजकारणात चांगलंच तापलं असून, शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे.
अश्यातच, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा समाचार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागले आहे. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “आमच्या विरोधात बोलाल, तर तुम्हाला शूट करू. आमच्या बाजूने आलात, तर तुम्हाला सेट करू, हे गलिच्छ राजकारण सुरू आहे.
रोशनी शिंदे या गर्भवती महिलेला मारहाण करण्यात आली, ही निंदनीय घटना आहे. एवढे गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण कधीच झाले नव्हते. यापूर्वी शरद पवार, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरही टीका झाली होती. पण, आमच्या विरोधात बोलाल, तर उद्ध्वस्त करून टाकू, ही पद्धत वाईट आहे..’ असं सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांकडे कामाचा ताण जास्त असेल, तर दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी. तसेच, एकनाथ शिंदे, तुम्ही राज्याचे चालक आणि पालक आहात. एका गटाचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागू नका…’ असं देखील सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.