मुंबई : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओवरून सध्या राज्यात एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक देखील केली आहे. यात ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शीतल म्हात्रेंना थेट आव्हानच दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना,”शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या फेसबूक खात्यावरून जे लाईव्ह झालं होतं ते नंतर डिलीट करण्यात आलं. ते सायबर पोलिसांनी ‘रिकव्हर’ केलं पाहिजे. व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असेल, तर त्यांनी ओरिजिनल व्हिडीओ दाखवलाच पाहिजे.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी,“जी एसआयटी नेमायची आहे ती उच्च न्यायालयाच्या अखत्यारित नेमली पाहिजे. व्हिडीओ व्हायरल करणे हा गुन्हा नाही. व्हिडीओ पहिल्यांदा अपलोड करणारा गुन्हेगार असतो. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
तर उपमुख्यमंत्र्यांविषयी बोलताना,“गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी ठरत आहेत. चर्चेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पाठलाग होत असेल, तर गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने आदेश देऊन गृहखातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काढून घेतलं पाहिजे. हे चुकीचं होत आहे,” असे म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.