मुंबई – पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकीचा संदेश एका अज्ञात व्यक्तीने पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने तपास यंत्रणा कामाला लावली.
या तपासात बंगळुरूच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी 34 वर्षीय जयसिंग राजपूत या आरोपीला जेरबंद केलं. जयसिंग राजपूत असं या युवकाचं नाव असून तो सुशांतसिंग राजपूतचा जबरा फॅन आहे.सुशांतसिंगच्या मृत्युमुळे या आरोपीला अतिशय दु:ख झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
दरम्यान, मुंबईच्या सायबर सेल पथकाने आरोपीच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतला असतो तो बंगळुरू येथे असल्याचं समजले. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन आरोपी जयसिंग राजपूत यास अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.