स्वच्छ सर्वेक्षणातील पंचतारांकित नामांकनासाठी प्रस्ताव तयार
पिंपरी (प्रतिनिधी) – स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडला पंचतारांकित नामांकन मिळावे, यासाठी शहर कचरामुक्त असल्याची स्वयंघोषणा महापालिका करणार आहे. तशा आशयाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांमार्फत मांडण्यात आला आहे. स्थायी समिती सभेत त्याबाबत मंजुरीचा ठराव झालेला आहे. आता हा प्रस्ताव बुधवारी (दि. 20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याचे नियोजित आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे 24 मे 2019 अनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन देण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. 15 मे 2015 ला याबाबतचा एक शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यानुसार ही कार्यवाही करायची आहे. राज्यभरात मिशन मोड पद्धतीने अभियान सुरू करण्यात आलेले आहे. या अभियानातंर्गत सर्व शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनातंर्गत स्वच्छ करणे अशा दोन मुख्य बाबींचा समावेश केलेला आहे. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातंर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण-2020 ची अंमलबजावणी करीत आहे. त्यानुसार शहराची कचरामुक्त शहर म्हणून स्टार रेटींग जाहीर करणे आवश्यक आहे.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहराला पंचतारांकित नामांकन (5 स्टार रॅकींग) – कचरामुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) मिळावे, यासाठी महापालिका प्रशासन केंद्र शासनाने तयार केलेल्या नियमावली, मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धतीनुसार उपाययोजना करीत आहे. तसेच, शासनाने त्यासाठी दिलेल्या सर्व नियमांची महापालिका पूर्तता करीत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहराला पंचतारांकित नामांकन (कचरामुक्त शहर) म्हणून मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
महापालिकेच्या उपाययोजना :
शहरातील घरोघरी कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक
आणि प्रक्रियेसाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर
गटार, नाले व सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणारी स्वच्छता
हरकती व सूचना मागविणार
महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबत 15 दिवसांच्या कालावधीत नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून घेऊन मानंकाबाबत समाधान असल्याचा प्रस्ताव शासनाला सादर करावा लागणार आहे. तसेच, पंचतारांकित नामांकनासाठी महापालिकेला स्वयंघोषणा करावी लागणार आहे.
स्वच्छता ऍपचा वापर
शहर क्षेत्रात प्लॅस्टिक बंदीची कार्यवाही
यांत्रिकी पद्धतीने खत निर्मिती प्रकल्प (क्षमता : प्रतिदिन 500 टन)
गांडूळ खत निर्मिती प्रकल्प (क्षमता : प्रतिदिन 30 टन)
प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती (क्षमता : प्रतिदिन 5 टन)