राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा

डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपतीभवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व नामवंत आणि तरूण चित्रकारांचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या चित्रकारांच्या कलाकृती कायम स्वरूपी राष्ट्रपतीभवनात लावण्यात येणार आहेत. असा उपक्रम राबविण्याचा मान डॉ. पाचारणेंना मिळाला असून त्यांच्या रूपाने मराठीची चित्रमुद्राच राष्ट्रपतीभवनात उमटली आहे.

राष्ट्रीय ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राष्ट्रपतीभवनात बहुतांश परदेशी चित्रकारांचीच चित्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर या भव्य वास्तुत देशातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांचाही समावेश व्हावा या चिंतनातून डॉ. पाचारणे यांनी अकादमीच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस केला. त्याचीच फलश्रूती म्हणजे देशातील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार आणि तरूण चित्रकारांच्या निवासी शिबीराचे या वास्तुतीतील आयोजन होय.

10 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधित आयोजित या शिबीरामध्ये देशातील ज्येष्ठ व नामवंत 12 चित्रकार आणि 3 तरूण चित्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकार हा आपल्या वैशिष्टपूर्ण शैलीसाठी प्रसिध्द असून त्यांच्या दीर्घ साधनेतून राष्ट्रपती भवनाच्या वास्तुत श्रेष्ठ कलाकृती आकारला येत आहेत. प्रत्येक चित्रकार या शिबीरा दरम्यान आपल्या दोन कलाकृती तयार करीत आहे.

राष्ट्रपती भवनातील निसर्गरम्य वातावरणात चित्र काढण्याचा वेगळाच आनंद असल्याचे मुबंई येथील ज्येष्ठ व नामवंत चित्रकार सुहास बहुलकर यांनी सांगिलते. चित्रकारांच्या पहिल्यावहिल्या निवासी शिबीरात सहभागी होण हा बहुमान असल्याचेही ते म्हणाले. बहुलकर यांनी भिंतीवरील चित्रशैली आणि त्यात पोतांचा लिलया वापर करून या ठिकाणी दोन कलाकृती साकारल्या आहेत. त्यात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, वाडे, पुर्वज आणि त्याच्यावर उमटलेल्या नियतीच्या पाऊल खुणा रेखाटली असून या सगळ्यांची वर्तमानासोबत सांगड घातली आहे.

तुळजापूर येथील सिध्दार्थ शिंगाडे आणि अहमदनगर येथील प्रणिता बोरा हे तरूण चित्रकारही या ऐतिहासिक शिबीरात सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 17 नोव्हेंबर रोजी स्वत: या निवासी शिबीराचे अवलोकन करणार असून सहभागी चित्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. या शिबीरादरम्यान चित्रकारांनी चितारलेल्या कलाकृती कायमस्वरूपी राष्ट्रपतीभवनात प्रदर्शीत करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाची शोभा या कलाकृतींच्या माध्यमातून वाढणार आहे. राष्ट्रपती भवनास भेट देणारे देश-विदेशातील विशेष अतिथी तसेच सामान्य जनतेलाही या कलाकृती बघायला मिळणार आहेत.

शिबीरात सहभागी कलाकारांमध्ये अंजली इला मेनन, अन्वर खान, अर्पिता सिंग, चंद्रा भट्टाचार्यजी, चिन्मय रॉय, गणेश हालोई, क्रिशेन खन्ना,लालुप्रसाद शॉ, परमजित सिंग, सनत कर, संजय भट्टाचार्य आणि सुहास बहुलकर या ज्येष्ठ व नामवंत चित्रकारांसह विम्मी इंद्रा , प्रणिता बोरा आणि सिध्दार्थ शिंगाडे या तरूण चित्रकारांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.