मुंबई – सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एकता कपूरला तिच्या वेब सीरिज XXX मधील आक्षेपार्ह मजकुरासाठी फटकारले. चित्रपट निर्माती आणि टीव्ही क्वीन एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी झाली आहे. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने कडक टिप्पणी करत एकता कपूरला सुनावले की, तुम्ही देशातील तरुण पिढीचे मन भ्रष्ट करत आहात.
ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजीच्या XXX वेब सिरीजमध्ये सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याबद्दल बेगुसराय येथील एका माजी सैनिकाच्या तक्रारीवरून स्थानिक न्यायालयाने वॉरंट जारी केले. बेगुसराय न्यायालयाने (बिहार) जारी केलेल्या वॉरंटविरोधात एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
एकता कपूरनेही या वॉरंटला आव्हान देत पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालय सुनावणीला विलंब करत असल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने कोणताही आदेश देण्याऐवजी एकता कपूरची याचिका प्रलंबित ठेवली आहे. उच्च न्यायालयातील सुनावणीची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक वकिलाची मदत घेणे योग्य ठरेल, असा सल्ला न्यायालयाने त्यांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फटकारले
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले की,”काहीतरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन भ्रष्ट करत आहात. OTT सामग्री सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणते पर्याय देत आहात? उलट तरुणांची मने तुम्ही कलुषित करत आहात.”
एकता कपूरच्या वतीने तिचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ‘पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोहतगी म्हणाले की, मालिकेचा आशय प्रेक्षकांवर आधारित असून या देशात काहीही आवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावर न्यायालयाने जनतेला कोणता पर्याय दिला जात आहे.’अशी विचारणा केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, “प्रत्येक वेळी तुम्ही या न्यायालयात येत… आम्ही त्याचे कौतुक करत नाही. अशी याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करू. मिस्टर रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता…हे न्यायालय आवाज असलेल्यांसाठी नाही. ज्यांना आवाज नाही अशा लोकांसाठी हे न्यायालय काम करते. ज्यांना सर्व सुविधा मिळूनही न्याय मिळू शकत नाही, मग सामान्य माणसाचे जीवन कसे असेल याची कल्पना करा.’