नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मागास जातीचे खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते; परंतु त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिल्याने त्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
आपले जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा एका न्यायिक समितीने आधी दिला आहे असा दावा करीत नवनीत राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत करीत या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. खासदार राणा यांच्यावतीने ज्येष्ट विधीज्ञ ऍड. ढाकेफाळकर आणि ऍड. गाडे यांनी बाजू मांडली.