नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वकील रेणू सिन्हा यांचा मृतदेह रविवारी संध्याकाळी त्यांच्याच बंगल्याच्या बाथरूममध्ये आढळला होता. त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत होता. त्यामुळेच हे प्रकरण खुनाचे आहे हा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता, त्यानुसार २४ तास आपल्याच बंगल्यात लपून बसलेल्या सिन्हा यांच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी रेणू सिन्हा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. रेणू सिन्हा यांच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत रेणू यांचा मृतदेह आढळून आला. रेणू सिन्हा यांच्या भावासह कुटुंबाने त्यांच्या पतीनेच ही हत्या केली असावी हा संशय व्यक्त केला होता.
रेणू सिन्हा यांचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा त्यांचे पती घरातून बेपत्ता झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रेणू सिन्हा यांच्या पतीला त्यांच्या घरातूनच अटक केली. हत्येनंतर रेणू सिन्हा यांचा पती बंगल्याच्या स्टोअर रूममध्ये लपला होता. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. नितीन सिन्हा असे रेणू सिन्हा यांच्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी नितीनला अटक केली आहे.
रेणू सिन्हा यांचा पती नितीन सिन्हाला बंगला विकून परदेशात जायचं होतं. रेणू सिन्हा यांची हत्या करण्याआधी नितीनने ब्रिटिश पासपोर्टही तयार केला होता. रेणू यांना मात्र हा बंगला विकायचा नव्हता, त्या बंगला विकण्यासाठी विरोध दर्शवत असल्याने नितीनने त्यांचा काटा काढला. रेणू सिन्हा यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचीही तयारी त्यांच्या पतीने केली होती. पोलीस जेव्हा बंगल्यावर पोहचले तोपर्यंत नितीनने बरेच पुरावेही मिटवले होते. मात्र सगळे पुरावे मिटवण्याआधीच पोलीस तिथे पोहचले. पहाटे तीनच्या सुमारास नितीनला अटक करण्यात आल्यानंतर त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली.