मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात जामीन नाकारला होता.त्यानंतर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागत जामिनासाठी अर्ज केला होता. आज नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.
नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी अर्ज केला होता त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजते.
नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत होते. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्जाला ईडीने जोरदार विरोध केला होता. गेले वर्षभर मलिक हे त्यांच्या आवडीच्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारांत तपासयंत्रणेने कोणतीही आडकाठी केलेली नाही असं ईडीने म्हंटले होते. उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयाने मालिकांना दिलासा देत जामीन मंजूर केला.
ईडीने केला आहे आरोप
मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. 20 वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.