सातारा – “आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आदी घोषणांनी गोवे परिसर दणाणून सोडत सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला गावातील सर्व जातीय धर्मीयांनी पाठिंबा दर्शवला आहे. आगामी कालावधीत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवार, दि. 3 रोजी वाढे फाट्यापासून ते पोवईनाका, राजवाड्यापर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन देण्यात येणार आहे.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात सगळीकडे शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. दुसरा टप्यातील आंदोलन सगळीकडे सुरू झाली आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता वाढत असून नेते, पुढाऱ्यांना गावबंदी आहे. गोवे गावात बुधवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लिंब, वनगळ, मर्ढे, शिवथर आदी गावातील ग्रामस्थांनी भेटी देत आंदोलनाची पुढील रननिती ठरवून पाठिंबा दर्शवला आहे. तसेच जो जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला गावातील सर्व जाती-धर्मीयांनी पाठिंबा दर्शवल्याने मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या आभार मानण्यात आले.