जिल्ह्यात रविवारच्या सुटीची साधली पर्वणी, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उडवली प्रचाराची राळ
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- गळ्यात पक्षाचा स्कार्फ, हातात झेंडा आणि डोक्यावर टोपी घालून गल्लोगल्ली घोषणाबाजी करत फिरणारे कार्यकर्ते ठिकठिकाणी प्रचार रॅली आणि पदयात्रांचा वाढता जोर, फटाक्यांच्या आतषबाजीत होणारे उमेदवारांचे स्वागत असे चित्र रविवारी (दि. 13) जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसले. रविवारची पर्वणी साधत विभागातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांनी प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला होता. दरम्यान, आज पावसाचे वातावरण होते मात्र, काही भाग वगळता पाऊस न कोसळल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचार केला.
विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा उमेदवारांच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर, शिरूर-हवेली, पुरंदर-हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव-शिरूर, मावळ या दहाही मतदारसंघात सोमवारी (दि. 21) मतदान होणार असून यासठी प्रत्येक उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने व प्रचारासाठी शेवटचा रविवार असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष उमेदवारांनी डोळ्यापुढे ठेवले होते. प्रचार रॅली, पदयात्रा काढत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रभागातील बिल्डिंग, “घर टू घर’, थेट बांध उमेदवारांनी अक्षरशः पिंजून काढल्या होत्या. प्रचाराच्या सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर अधिक फोकस केल्याचे पाहायला मिळत होते.
प्रचार रॅली, पदयात्रा आणि चौकसभांचे आयोजन करत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी जिल्हा दणाणून गेला होता. तसेच सुटीनिमित्त घरी असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. शक्तिप्रदर्शनाचीही संधी यावेळी उमेदवारांनी साधली. आतापर्यंत निवडणुकीचे वातावरण तापले नव्हते. मात्र, रविवार सुटीचा दिवस व उमेदवारांनी प्रचारासाठी साधलेल्या संधीमुळे जिल्ह्यात प्रथमच निवडणुकीची फील जाणवला.
प्रमुख पक्षांसह अपक्षांनी निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मागे टाकून आपली प्रतिमा अधिक उजळण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष मतदारांना भेटून आपली भूमिका पटविणे उमेदवारांना गरजेचे वाटत आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारच्या सुटीचा चांगलाच वापर करुन घेतला.
- सायंकाळनंतर जंगी मेजवानी
सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी वाजत-गाजत प्रचार मिरवणुका काढल्या. ध्वनिक्षेपकावरुन लक्षवेधी घोषणांचा पाऊस पाडत मतदारांना आकर्षति करण्यात आले. अनेकांनी मतदारांच्या उंबरठ्यावर जाऊन मतदानाची याचना केली. त्याचबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या विशेष खान-पानकडेही लक्ष पुरविण्यात आले. यामुळे सायंकाळनंतर जिह्यातील हॉटेल तसेच शहर-गावाबाहेरील धाबे, रिसॉर्ट येथे जंगी मेजवानी झोडली जात होती. - मतदारांच्या सुटीचे खोबरे
विधानसभा निवडणूक सोमवारी (दि. 21) होणार असून शनिवारी (दि. 19) सायंकाळी प्रचाराची तोफ थंडावणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आजचा एकमेव रविवार सुटीचा लाभ उठवत सर्व पक्ष, अपक्ष तसेच उमेदवारांनी प्रचारासाठी गावे पिंजून काढले. मतदानाचे आवाहन करण्यासाठी वाजत-गाजत येणाऱ्या मिरवणुका आणि थेट दारी पोहोचणारे प्रचारक यांच्यामुळे मतदारांचे मात्र सुटीचे खोबरे झाले. येणाऱ्या प्रत्येक उमेदवार व त्यांच्या समर्थकांना तोंड देत मतदान करू, असे सांगत सुटीपासून मुकलेल्या मतदारांनी त्यांची बोळवण केली.