मोकाट कुत्री पळविण्यासाठी कुंकवाच्या पाण्याच्या बाटल्या
पुणे – शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र, विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत वावर असलेल्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी पालिका कर्मचाऱ्यांनी चक्क स्मशानभूमीच्या गेटलाच कुंकवाचे पाणी असलेल्या बाटल्या बांधल्या आहे. या स्मशानभूमीच्या आतमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाची आरोग्य कोठी असून या कर्मचाऱ्यांनी या बाटल्या लावल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पसरलेले कुंकवाच्या पाण्याचे लोण शहरातही पसरले असले दिसून येत आहे.
सिंहगड रस्त्यावर विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच महापालिकेची मुक्तीधाम ही स्मशानभूमी आहे. त्याच्याच परिसरात महापालिकेची आरोग्य कोठीही असून त्या ठिकाणी दुपारपर्यंत सुमारे 20 ते 25 पालिका कर्मचाऱ्यांचा वावर असतो. मंदिराचा परिसर असल्याने तसेच बाजूला नदी असल्याने या भागात अनेकदा भाविकांना ठिकठिकाणी प्रसाद तसेच नैवेद्य ठेवला जातो. त्यामुळे या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक आहे. तर पावसाळ्यात ही कुत्री अनेकदा स्मशानभूमीच्या आवारात आसरा घेतात. त्यामुळे अनेकदा अंतयात्रेसाठी आलेल्या नागरिकांनाही या कुत्र्यांच्या उपद्रवाचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ही कुत्री पकडून नेऊन त्यांची नसबंदी करण्यासाठी आरोग्य विभागाकडे सूचना करण्याऐवजी शहरात पसलेल्या कुंकवाच्या पाण्याच्या अंधश्रद्धेचाच आधार घेतला असून कुंकवाचे पाणी बाटलीत भरून ठेवल्यास मोकाट कुत्री येत नाहीत, असे गृहीत धरून स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरच दोन लाल पाणी भरलेल्या बाटल्या लटकविल्या आहेत.
मोकाट कुत्र्यांवर परिणाम नाही
सिंहगड रस्ता परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कुंकवाच्या पाण्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांच्या बाहेर या बाटल्या ठेवल्या जात आहेत. याच भागात आनंदनगरमधील एकता नगरी परिसरात एका चारचाकी वाहनावर गेल्या काही दिवसात एक मोकाट कुत्रे वारंवार बसत आहे. त्यामुळे संतापलेल्या गाडीमालकाने कुत्र्याला हुसकावून लावण्यासाठी गाडी रस्त्यावर उभी केल्यानंतर कुंकवाचे पाणी असलेली बरणी वाहनावर ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, मोकाट कुत्र्यावर काहीच परिणाम न होता. या भरणी शेजारीच या कुत्र्याकडून ठाण मांडून आराम केला जात असल्याचे दैनिक “प्रभात’च्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे या बाटल्या केवळ अफवा असून त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा वावर कमी झालेला नसला तरी, नागरिकांना मात्र समाधान मिळत असल्याचे चित्र आहे.