एक जुलै 2019 च्या अंकात याच स्तंभात उल्लेखलेली कंपनी होती, रिलायन्स रिटेल. अजून शेअर बाजारात नोंदणी न झालेल्या या कंपनीचा ग्रे-मार्केटमधील भाव होता 550 ते 600 रुपयांच्या दरम्यान. हाच भाव मागील आठवड्यात वधारून थेट 750 ते 775 रुपयांवर गेलाय, म्हणजे 200 रुपयांची तेजी ! याचं कारण म्हणजे, दोन आठवड्यापूर्वी जाहीर झालेले या कंपनीचे वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे निकाल.
दुसऱ्या तिमाहीतील कंपनीचा नफा हा 55 टक्क्यांनी वाढून 1148 कोटी रुपयांवर पोहोचला आहे तर कंपनीचे उत्पन्न मागील वर्षीच्या ह्याच कालावधीपेक्षा 27 टक्क्यांनी वाढून 41202 कोटी रुपये झालेलं आहे. करपूर्व नफ्यातील मार्जिन्स देखील 6.3 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
किराणा, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि लाईफस्टाईल या विभागांमध्ये कंपनीनं आपले पाय रोवत रिलायन्स रिटेलने तिमाहीत नवीन 337 स्टोर्स उघडले आणि स्टोर्सची एकूण संख्या 10900 वर नेली. हेच आकडे डिजिटल स्टोर्सच्या बाबतीत 8200 च्या वर आहेत तर मागील तिमाहीत कंपनीनं एकूण 63 लाख व्यवहारांची नोंद केलीय.
याव्यतिरिक्त, मागील आठवड्याच्या शेवटास केलेली घोषणा ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोर्डाने आज आपल्या डिजिटल व्यवसायासाठी संपूर्ण मालकीची उपकंपनी तयार करण्यास मान्यता दिली आहे आणि त्यात 1 लाख 8 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे जी रक्कम जिओचं कर्ज कमी करण्यासाठी वापरली जाईल. एकूणच हा धडाका पाहता व येणाऱ्या दिवसांत याच्या आयपीओची संभावना लक्षात घेता हा शेअर पुन्हा सुपरशेअर ठरणार हे नक्की.