पुणे – आयपीएल स्पर्धेत आज (मंगळवार) सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स या दोन संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर लढत रंगणार आहे. यंदा या स्पर्धेचे सर्व साखळी सामने महाराष्ट्रात होत असून 55 सामने मुंबईतील तीन मैदानांवर होतील तर 15 सामने पुण्यातील गहुंजे मैदानावर होणार आहेत.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
ठिकाण – एमसीए गहुंजे स्टेडियम, पुणे
वेळ – संध्याकाळी 7-30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
या मैदानाची प्रेक्षक क्षमता 37 हजार असली तरीही केवळ 25 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार असल्याने अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र, 15 सामने येथे होणार असल्याने चाहत्यांना किमान काही सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. या स्पर्धेतील पुण्यातील पहिला सामना हैदराबाद व राजस्थान यांच्यात होणार आहे. या दोन संघात कोणता संघ यशस्वी ठरतो यावर पुण्यातील खेळपट्टी आपले दान कोणाच्या पारड्यात टाकते हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.
– करोनाच्या धोक्यानंतर प्रेक्षकांना प्रवेश
– प्रेक्षक संख्या आसनक्षमतेच्या 25 टक्के
– केन विल्मसनवर हैदराबादची मदार
– राहुल त्रिपाठी व निकोलस पूरन यांच्यावर फलंदाजी अवलंबून
– नटराजन, जेन्सन, त्यागी व मलिकवर गोलंदाजीचा भार
– राजस्थानची फलंदाजी जास्त सशक्त
– बटलर, दुसान, सॅमसन, पडीक्कल व पराग ठरणार धोकादायक
– पुण्यातील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन
– किमान 180 ते 200 धावांची अपेक्षा
– संध्याकाळी दव निर्णायक ठरेल
हैदराबाद व राजस्थान यांच्यातील आजवर झालेल्या सामन्यांचे चित्र पाहिले तर दोन्ही संघांनी अनुक्रमे 8 व 7 सामने जिंकले आहेत. हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 201 तर राजस्थानने 220 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवलेली आहे. हैदराबादला यंदाच्या मोसमात अनुभवी डेव्हीड वॉर्नर याची उणिव निश्चितच जाणवणार आहे. त्याच्याच कामगिरीच्या जोरावर हैदराबादने ही स्पर्धा एकदा जिंकली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या मोसमात संघ व्यवस्थापनाशी बेबनाव झाल्यामुळे वॉर्नरला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली होती, त्याला संघाच्या डगआऊटमधूनही बाहेर जाण्यास सांगितले गेले होते. आता त्याच्या अनुभवाशिवाय मैदानात उतरणारा हैदराबादचा संध केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे ठरेल.
दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आपल्या संघाला यंदाच्या स्पर्धेच्या बाद पेरीत पोहोचवण्यासाठी पहिल सामन्यापासूनच सज्ज बनला आहे. त्याची वैयक्तीक कामगिरी सरस होत असली तरीही गेल्या काही मोसमांपासून राजस्थानला एक संघ म्हणून सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. सॅमसनसह रुसी वॅन दर दुसेन, रवीचंद्रन अश्विन, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल व रायन पराग यांच्याकडून सरस कामगिरीची अपेक्षा आहे. अश्विनसह यजुवेंद्र चहल व ट्रेन्ट बोल्ट हे हुकमी एक्के त्यांच्या गोलंदाजीत असल्याने हैदराबादसाठी हा सामना सोपा नसेल.