नवी दिल्ली -कितीही काळ तुरूंगात ठेवले तरी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी अरविंद केजरीवाल हेच राहतील, या भूमिकेचा पुनरूच्चार आपने सोमवारी केला. त्याचवेळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता महत्वाच्या भूमिकेत दिसतील, असे सूतोवाचही केले.
मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अशा दुहेरी जबाबदाऱ्या केजरीवाल यांच्या खांद्यांवर आहेत. त्यांच्या अटकेमुळे दिल्ली सरकार आणि पक्षाचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे.
अर्थात, मुख्यमंत्रिपद केजरीवाल यांच्याकडेच राहील या भूमिकेवर आप अजूनही ठाम आहे. मात्र, आगामी काळात केजरीवाल यांच्या पत्नीकडे पक्षातील महत्वाची भूमिका सोपवली जाण्याचे संकेत आपच्या सुत्रांनी दिले आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. इंडिया आघाडीचा घटक म्हणून आप विविध राज्यांत त्या निवडणुकीला सामोरा जात आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाच्या प्रमुखांची रवानगी तुरूंगात झाली आहे.
त्यामुळे आपच्या प्रचार मोहिमेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, पक्षीय कामकाज सुरळितपणे चालावे या उद्देशातून सुनीता पुढे सरसावण्याची शक्यता बळावली आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी इंडियाची सभा झाली. त्या सभेला सुनीता उपस्थित राहिल्या. त्या घडामोडीकडे एकप्रकारे सुनीता यांचे राजकीय पदार्पण म्हणूनच पाहिले जात आहे.