– नित्तेंन गोखले
सेंच्युरी हाउस ही इमारत एमआय 6 संस्थेचे कार्यालय असताना ब्रिटन सरकारसाठी अडचण, तर जगभरासाठी थट्टेचा विषय बनली होती.
सध्या ब्रिटनची एमआय 6 संस्था ही हेरगिरी करते हे जगजाहीर आहे; परंतु 1980 चा काळ वेगळा होता. गुप्तचर संस्था अधिकृतपणे अस्तित्वात नव्हत्या.ब्रिटिश सरकारने या काळात अनेकदा अशा यंत्रणेचे अस्तित्व नाकारले. तरीदेखील एमआय 6चे त्या काळातील कार्यालय लंडनमधील वेस्टमिन्स्टर ब्रिज रोड वेर, सेंच्युरी हाउस येथे असल्याची माहिती लंडनमध्ये शाळेतल्या मुलांनादेखील होती.
एमआय 6 या हेरगिरी करणाऱ्या ब्रिटिश संस्थेचे कार्यालय सेंच्युरी हाउसमध्ये 1964 दरम्यान स्थलांतरित झाले. याचे बांधकाम 1959 ते 1964 या कालावधीत पूर्ण झाले. इमारतीची रचना ब्रिटनच्या सर्वात प्रतिष्ठित आर्किटेक्चरल कंपन्यांपैकी एक, पी. एम. देवेरेक्स यांनी केली.
एजन्सीचे कार्यालय सेंच्युरी हाउस येथे स्थलांतरित झाल्यावर सुरुवातीला सर्वांनाच ही जागा योग्य वाटत होती. तसा विचार करणे काही चुकीचे नव्हते. कारण, सेंच्युरी हाउस आधी 54 ब्रॉडवे (व्हिक्टोरिया स्ट्रीट, लंडन) येथील ऑफिसच्या जागेत दुकाने, रेस्टॉरंट्स, व खासगी निवासस्थान देखील होती. याउलट, सेंच्युरी हाउसमध्ये संपूर्ण बिल्डिंग एमआय 6 च्या ताब्यात होती.
गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात कशा प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये असतात? ती सेंच्युरी हाउस येथील एमआय 6 च्या कार्यालयात होती का? रेडिओ लहरींना रोखण्यासाठी लागणारी यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, हायटेक सुरक्षा गेट्स आणि विविध प्रकारच्या सॅटेलाइट डिश या फक्त मूलभूत गोष्टी आहेत. इमारतीचा बाह्य भाग सुपर-हार्ड बुलेटप्रूफ असणे गरजेचे. तसेच अतिरिक्त जाड दरवाजे व बुलेटप्रूफ काचा असलेल्या खिडक्यादेखील महत्त्वाच्या गोष्टी.
सेंच्युरी हाउस इमारतीत यापैकी काही वैशिष्ट्ये होती; परंतु काचेच्या मोठ्या खिडक्या असल्याने स्नूपिंगची भीती असायची. सर्वात धोकादायक बाब म्हणजे इमारतीच्या पायथ्याशी असलेले पेट्रोल स्टेशन. या दोन बाबींमुळे परिसर असुरक्षित बनला होता. ब्रिटनच्या नॅशनल ऑडिट ऑफिसने सरकार समोर 1985 साली सादर केलेल्या अहवालात एमआय 6 साठी इमारत असुरक्षित असल्याचे स्पष्ट नमूद केले. बिल्डिंगची सुरक्षा हा एमआय 6 समोरील असलेल्या अनेक समस्यांपैकी केवळ एक विषय होता. त्याकाळात एजन्सी डबल एजंटने भरलेली होती. अतिशय गोपनीय अहवालदेखील शत्रूंपर्यंत सहज पोहोचत.
वर्स्ट केप्ट सीक्रेट
गंभीर समस्या असूनदेखील सेंच्युरी हाउसबाबत ब्रिटिश सरकार नेहमीच मौन पाळायचे. एमआय 5 किंवा 6 अशा हेरगिरी करणाऱ्या संस्थाच नसल्याचे ते सांगत; परंतु सेंच्युरी हाउसमध्ये काय काम चालते हे टुरिस्ट गाईड, टॅक्सी व बसचालक आणि चक्क के.जी.बी एजंटनाही माहीत होते. जेम्स बॉंड ऊर्फ 007, याच इमारतीतून जग वाचवण्यासाठी धाव घेतो, असे इमारतीबाहेर थांबून टुरिस्ट गाईड पर्यटकांना सांगत असत. बस कंडक्टर अनेकदा या बिल्डिंगजवळील बसस्टॉपचा उल्लेख स्पाइज कॉर्नर असा करायचे. टेलिग्राफ या वृत्तपत्राने सेंच्युरी हाउस या 22 मजली इमारतीत असलेल्या एमआय 6 कार्यालयावर चक्क एक लेख प्रसिद्ध करून याचा उल्लेख “लंडन्स वर्स्ट केप्ट सीक्रेट’ असा केला होता.
मुख्यालय का केले स्थलांतरित?
सुरक्षेचा प्रश्न तर होताच. याशिवाय, इमारतीचा भाडेकरार 1994 मध्ये कालबाह्य होणार होता. सेंच्युरी हाउसचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले आणि त्यासाठी अपेक्षित खर्च प्रचंड होता. अनेक पैलूंचा विचार करून शेवटी एमआय 6 ने 1994 दरम्यान व्हॉक्सहॉल क्रॉस जवळ असलेल्या नवीन इमारतीत मुख्यालय नेले. सध्या ही बिल्डिंग एस.आय.एस/एमआय 6 इमारत म्हणून ओळखली जाते.
दुसरीकडे, सेंच्युरी हाउस इमारतीचे नूतनीकरण करून त्याचे निवासी जागेत रूपांतर करण्यात आले.
एसेल आर्किटेक्चर या कंपनीला कामासाठी नियुक्त केले गेले. नूतनीकरणादरम्यान, एक खासगी ट्यूब स्टेशन, एक शक्तिशाली रासायनिक विघटन यंत्रणा आणि एक तळघर या इमारतीखाली सापडल्याचे सांगितले जाते. अभियांत्रिकी फर्म, वॉल्श इंजिनीअर्सने एसेलआर्किटेक्चरसाठी हा पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला. इमारतीच्या संरचनेत त्रुटी आढळल्याने त्यात बदल करावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनीने बिल्डिंगखाली असलेल्या बेकरलू बोगद्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण केले.
व्हॉक्सहॉल क्रॉसवरील कथा
लंडन थेम्स नदीच्या काठावर असलेली आर्किटेक्ट टेरी फॅरेल यांनी डिझाइन केलेली ही इमारत स्कायफॉल, स्पेक्टर आणि द वर्ल्ड इज नॉट इनफ यांसारख्या चित्रपटांमध्ये दाखवली गेली आहे. नवीन कार्यालयात स्थलांतरित झाल्यानंतर, ब्रिटन संसदेने गुप्तचर सेवा कायदा 1994 लागू केला. सरकारकडून एजंसीचे अस्तित्व अधिकृतपणे मान्य करण्यात आले. तज्ज्ञांकडे असलेल्या माहितीप्रमाणे ही मालमत्ता एस.आय.एसने योग्य दरात खरेदी केली. त्याबरोबरच सुरक्षा वाढविण्यासाठी बिल्डिंगमध्ये अनेक बदलदेखील केले. एमआय 6 कार्यालयातून थेट व्हाईटहॉलपर्यंत एक बोगदा असल्याची अफवा अनेकदा चर्चेचा विषय बनते.
पुढे साल 2000 दरम्यान रिअल आयरिश रिपब्लिकन आर्मी आतंकवादी संघटनेने या बिल्डिंगवर अँटी टॅंक रॉकेट वापरून हल्ला केला. त्यानंतर 2010 मध्ये इमारतीच्या पोस्टल हॅंडलिंग टीमला पार्सल बॉम्ब फुटण्याआधी सापडल्याने आणखी एक अनर्थ टळला. या दोन्ही घटनांनंतर इमारत अधिक सुरक्षित करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले. या बिल्डिंगच्या परिसरात फिरणेदेखील कायदेशीररित्या गुन्हा आहे.