संडे स्पेशल : आनंदयात्री…

-माधुरी विधाटे

आज सकाळच्या प्रसन्न वेळी टीव्ही सुरू केला आणि करोनाने घातलेले मृत्यूचे थैमान नजरेला पडले. मनावर एक अनामिक मळभ दाटून आले. खरंच मृत्यूची किती भीती वाटते ना मनाला. जन्माला येणारा प्रत्येक जण मरणारच आहे. मृत्यू हा अटळ आहे. हे अंतिम सत्य माहीत असते, तरीदेखील जाण्याची एवढी भीती का वाटते?

मला तरी वाटते, या सुंदर जगातील अजून खूप सुंदर गोष्टी अनुभवायच्या आहेत, खूप कर्तव्ये, जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. मनातल्या खूप आवडीनिवडी, छंद जोपासायचे राहूनच गेले, काही चांगले काम करायचे राहून गेले असे वाटते. आपल्या प्रियजनांना सोडून कायमचे दूर निघून जाण्याची कल्पना मनाला सहन होत नाही, म्हणून दाटून येते मृत्यूचे भय.

या भूतलावर आपण जन्माला येतो, ते जणू सासरघरी येतो आणि इथली जीवित कार्ये संपवून परत आपल्या माहेरीघरी जातो, असे असते ना खरेतर! पण ही उदात्त भावना मनात यायला मन थाऱ्यावर तर असले पाहिजे. मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनेच काळवंडून जाते ते. मग समोर दिसू लागतो, नुसता अंधार, अंधार आणि अंधारच. पण त्या अंधारभरल्या गुंफेतूनच, प्रकाशाकडे जाणारी एक वाट आहे. मृत्यू हा शेवट नाही, तर नवीन जीवनाची सुरुवात आहे. वयाच्या थोड्या प्रौढत्वाच्या टप्प्यावर हे अंतिम सत्य थोडे थोडे उमगू लागते.

भगवद्‌गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा अमर आहे, अविनाशी आहे. जीर्ण झालेल्या देहाच्या वस्त्राचा त्याग करून तो नवीन शरीरात प्रवेश करतो. मृत्यू पावते ते फक्‍त शरीर, आत्मा नाही. हे सत्य आता पूर्णपणे स्वीकारले तर मृत्यूभय वाटणार नाही. त्यासाठी उत्पत्ती आणि लय ही सृष्टीची मूलभूत तत्त्वे आहेत, हे समजून घ्यायला हवे.

मुळात जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा जर महोत्सव केला, प्रत्येक क्षण आनंदाने जगला, तर मरणाची ही भीती मनाला स्पर्शदेखील करणार नाही. आपण सतत मनावर भूतकाळाचे ओझे ठेवतो आणि भविष्यकाळाची चिंता करत राहतो. त्यामुळे हातात असलेल्या वर्तमानकाळातील सुंदर क्षणांचा आनंद उपभोगायचा राहूनच जातो आणि मग ते क्षणही हातातून निसटून गेल्यानंतर वाटतं, अरे! खरंच किती सुंदर आयुष्य होतं तेव्हा आपलं; आपण उगाचच रडण्या कुढण्यात ते क्षण व्यर्थ घालवले. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात,

सांगा कसं जगायचं, कुढतकुढत,
की गाणी म्हणत…

असं स्वतःच्याच मनाला विचारायला हवं. आजचा क्षण आणि क्षण जगता आला पाहिजे. आनंदयात्री होऊन जगता यायला हवं. पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर होऊन जगता यायला हवं. अशी कितीतरी आनंदयात्री माणसे आपल्या अवतीभवती असतात. ती स्वतः तर आनंदी राहतातच, जीवनातल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधतात आणि अवतीभवतीच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्‍तीवर आनंदाची उधळण करत राहतात. कुठल्याही विपरीत परिस्थितीत देखील त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य तसूभर देखील कमी होत नाही. सगळ्या वेदना, दुःखे काळजातच दडवून त्यांच्या अंतःकरणातील स्नेहाचा झरा अखंडपणे झुळझुळ वाहत राहतो. हा प्रसन्नतेचा, हसण्याचा आणि हसवण्याचा वसा आपण जर घेतलात तर आपले जीवनदेखील किती सुंदर होईल.
याचबरोबर अनाथांना, दीनदुबळ्यांना मदतीचा हात देऊन आनंदाचा शिडकावा करता यायला हवा. संकटात सापडलेल्या व्यक्‍तींना आपला प्रत्यक्ष मदतीचा हात, प्रसंगी दिलाशाचे चार धीराचे शब्दसुद्धा किती मोलाचे असतात. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद आपल्याही मनाला तृप्त करून जातो. हा आनंद शोधता यायला हवा.

अवतीभोवतीच्या जगात लपलेला इवल्याशा गोष्टीतील आनंद लुटता यायला हवा. मग ते चिमुकल्या बाळाचे निर्व्याज हसू असेल. हिरवागार निसर्ग असेल, पिसारा फुलवून मनमुक्‍त नाचणारा मयूर असेल, एखादे मनमोहक चित्र-शिल्प असेल, विठू माऊलीचा एखादा सुरेल अभंग असेल किंवा एखादी सुंदरशी कविता असेल.

जन्माला येऊन असे एखादे तरी काम करावे की आपण गेल्यावर देखील आपले नाव त्यांच्या स्मृतीत कायम चिरंतन राहील. प्रा. तुकाराम पाटील “आधार’ या कवितेत म्हणतात,

माती वरती ठेवून श्रद्धा
जगण्यावरती प्रेम करावे
दुसऱ्यासाठी झिजता झिजता
मरणालाही विसरून जावे
ज्ञानेशाच्या ओवी मधल्या
सामर्थ्याने समर्थ व्हावे
या जन्माचे करून सार्थक
नाव आपुले अमर करावे

असा जगण्याचा मूलमंत्र आत्मसात करता यायला हवा. चला तर मग आनंदयात्री होऊयात, आनंदाने, निर्भयपणे जगूयात. रोजच जगण्याचा महोत्सव साजरा करूयात.

Leave A Reply

Your email address will not be published.