जलसासमोर चाहत्यांच्या गर्दीला करतायत मिस
मुंबई : बिग बी या नावाने ओळखले जाणारे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी सध्या प्रत्येक रविवार सुना-सुना ठरतोय. येथील जुहू परिसरातील जलसा या आपल्या निवासास्थानाबाहेर जवळपास प्रत्येक रविवारी जमा होणाऱ्या चाहत्यांना ते स्वत: अभिवादन करायचे. मात्र, करोना संकटामुळे तब्बल 38 वर्षांची ती प्रथा ठप्प झाली आहे. चाहत्यांची गर्दी मिस करत असल्याची खंत 77 वर्षीय बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवरून व्यक्त केली.
करोनाच्या फैलावामुळे चाहत्यांना भेटण्याची प्रथा बंद करण्याची घोषणा त्यांनी मागील महिन्यात केली. मात्र, चाहत्यांची भेट घेऊन त्यांना अभिवादन करता येत नसल्याने ते स्वत: अस्वस्थ झाले आहेत. त्याविषयी वाटणाऱ्या भावनेला त्यांनी मोकळी वाट करून दिली. माझ्यासाठी आता रविवार पहिल्यासारखा राहिला नाही, असे त्यांनी म्हटले. करोना संकटाबाबत ते सातत्याने सोशल मीडियावरून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. आज जगभरातील लोकांच्या तोंडी करोना हा एकच शब्द आहे. मानवी जीवनाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असे त्यांनी याआधी म्हटले होते.