- कारवाईसाठी वाहतूक पोलिसांच्या हातीच लागेना
पिंपरी – रस्ते सुरक्षा सप्ताहांतर्गत वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करूनही पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, वाकडमधील दुचाकीस्वारांचे प्रबोधन झालेले दिसत नाही. येथील रस्त्यांवर सायंकाळनंतर वेगाने दुचाकी चालवणाऱ्या शिवाय स्टंट करणाऱ्यांची जत्राच भरते. उशिरापर्यंत ही स्टंटबाजी सुरू असते. या बेफान झालेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी ते पोलिसांच्या हातीच लागत नाहीत. काहीवेळा कारवाई होतेही मात्र, तरी हे प्रकार आजही सर्रास सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 18 ऑक्टोबरपासून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत एका विशेष अभियानाद्वारे वेगवान दुचाकी आणि कारचालकांवर कारवाई सुरू आहे. यामध्ये विशेषतः सायलेन्सर बदलणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दुचाकीस्वारांच्या विरोधात नियमांचे पालन न करता वाहन चालविण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. यात स्टंटबाजांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. शहराच्या विविध भागत अतिवेगाने वाहन चालवल्याच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.
आयटी पार्क, मुंबई-बेग्लोर महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, रावेत, प्राधिकरण, वाकड अशा अनेक ठिकाणी जीवघेणे स्टंट सुरू असतात. यात हे स्टंटबाज स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच; मात्र पादचाऱ्यांनाही धोका निर्माण होईल, असे कृत्य करतात. त्यामुळे नागरिकांनी अशा वेळी पुढाकार घेऊन वाहतूक पोलिसांनी याची माहिती देण्याचे त्याचबरेबर आपल्या मुलांवरही पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
वाहतूक पोलीस चौकामध्ये थांबून स्टंटबाज दुचाकीस्वार आढळला तर कारवाई करतात. मात्र बऱ्याचदा असे दुचाकीस्वार पोलिसांच्या हाती लागत नाही. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दुचाकीस्वारास अपघात झाल्यास त्याचे खापरही आपल्यावरच फुटेल, अशी भीती वाहतूक पोलिसांना असते. अशा दुचाकीच्या क्रमांकाची नोंद घेतल्यावर ऑनलाइन कारवाई करण्याचा पर्याय पोलिसांकडे असतो. मात्र अशा वाहनांचे क्रमांक बहुतांशवेळा बारीक अक्षरात लिहिलेले असल्याने ते सहजासहजी दिसून येत नाही.
प्रामुख्याने “या’ ठिकाणी होतात स्टंट
प्राधिकरण, रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, स्पाइन रोड, मोशी, तळवडे, मुंबई-बेंग्लोर महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे- नाशिक महामार्गावर रात्री सूनसान किंवा वाहतूक वर्दळ कमी असताना वेगाने दुचाकी चालविणे, स्टंट करण्याचे प्रकार घडतात.
रावेत, प्राधिकरण रस्त्यावर वारंवार वेगवान दुचाकी चालविण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. पोलिसांची गस्त घालणारी गाडी आल्यावर हे प्रकार तात्पुरते थांबतात. अगदी सकाळीही आणि रात्री उशिराही वेगाने दुचाकी चालविण्याने अपघात घडल्याचे अनेक प्रकार या भागात घडले आहेत. सध्या कॉलेज बंद असल्याने हे प्रमाण थोडे कमी असले तरी आजही कायम आहे. शाळा कॉलेजच्या बाहेरही हे स्टंटबाज उभे असतात.
– राजकुमार देसाई, ज्येष्ठ नागरिक, प्राधिकरण