women’s day special 2021: काव्यसंवेदना… वेदना मांडणारी कवयित्री

वर्ष 1819 मध्ये 31 ऑगस्ट रोजी, पंजाबमधील गुजरानवाला (आता पाकिस्तान) येथे अमृता प्रीतमचा जन्म झाला. स्त्रियांच्या वेदना मांडणारी कवयित्री, लेखिका म्हणून अमृता प्रीतम सर्वश्रुत आहे.
अमृताची आई राजबीबी ही सुस्वरूप व पेशाने शिक्षिका; तर वडील धार्मिक वृत्तीचे ग्यानी, कवी आणि शिक्षक. विवाहानंतर 10 वर्षांनी या एकुलत्या एक अपत्याचा जन्म झाला. अशा धार्मिक संस्कारात वाढलेल्या अमृताचे आयुष्य साधे, सरळ, सोपे असावयास हवे होते, पण ते तसे घडले नाही.

तिच्या सहाव्या वर्षी तिचा साखरपुडा झाला. वयाच्या 11 व्या वर्षी मातृछत्र हरपले. आई आजारी असताना, तिने देवाची खूप प्रार्थना केली पण आईचा मृत्यू झाला, तसा अमृताचा देवावरचा विश्‍वास उडाला. याच मनोवस्थेत तिला कवितांचा छंद लागला. 16 व्या वर्षी तिचा प्रीतमसिंह यांच्याशी विवाह झाला आणि अमृता कौरची अमृता प्रीतम झाली. त्याच वर्षी तिचा “अमृत लेहरन’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

पती प्रीतमसिंह व्यसनी व असंवेदनशील निघाला. दोघांचे कधीच पटले नाही. दोन मुले झाली. पण अखेर घटस्फोट झाला. स्त्रियांच्या व्यथा मांडणारा तिचे “कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक आपल्याला सुन्न करून टाकते. फाळणीच्या अनुभवाने तिचे संवेदनशील मन अधिकच गहिरे झाले. त्यावर तिने “पिंजर’ ही कादंबरी लिहिली. त्यावर चित्रपटही निघाला.

दुःखी, पीडित, रुढी परंपरेत अडकलेल्या स्त्रियांचा आवाज सतत तिच्या लेखनातून जाणवतो. तिची भाषा पंजाबी होती, पण तिचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. “नागमणी’ मासिकाचे तिने संपादन केले. लाहोर रेडिओ केंद्रावर तिने अनेक वर्षे काम केले. “कागज कॅनव्हास’ या पुस्तकासाठी तिला ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. तिच्या “सुनहडे’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.

“रसिदी टिकट’ हे तिचे आत्मचरित्रही गाजले. यात स्त्रीची वेगवेगळी रूपे, तिची सहनशीलता, वेदना यांचे वर्णन आहे. स्त्रियांवरील अन्याय, छळ यांचे वर्णन अंगांवर शहारे आणणारे आहे. मानवतेसाठी तिने लेखणीची तलवार केली. ती सतत झुंजत राहिली. नंतर तिने ओशोंच्या विचारांवरही चिंतन केले.
अमृताचे जीवन वारिस शहा, साहिर लुधियानवी आणि इमरोज यांचेशी एकरूप झाले आहे. म्हणूनच त्यांच्याबरोबरचे तिचे संबंध उलगडले की मगच खरी अमृता आपल्याला कळते.

वारीस शहांबरोबर तिचं “कलम का रिश्‍ता’ होता. तो मौलवी होता. पंजाबचा दर्द त्यांच्या कवितेतून प्रकट झाल्याने, त्यावेळी जनक्षोभ झाला होता. पण अमृताच्या कविता आजही वारीस शहांच्या मजारवर गायल्या जातात. यात विभाजनाच्या मानवी संवेदना लिहिल्या आहेत.

अमृताला एकदा “प्रीतनगर’ या गावात छोट्या मुशायऱ्याच्या निमित्ताने एका सुंदर सायंकालीन मैफिलीत “साहिर’ भेटला. त्यांची नजरानजर झाली. अमृता म्हणते, त्यांच्यात मौनाचा रियाज होता. त्यातूनच शब्दरूपाने कागदावर नक्षत्रे उमटू लागली. अगदी झरझर, पानगळीसारखी. लाहोरमध्ये असताना “साहिर’ अमृताच्या घराजवळ येऊन थांबत असे. सिगारेट ओढत तासन्‌तास तिच्या खिडकीकडे बघत बसे. अमृताशी नजरानजर होण्यासाठी ताटकळत असे यातूनच-
तेरे घरके सामने, एक घर बनाऊँगा
दुनिया सजाऊंगा, तेरे घरके सामने
या गाण्याचे शब्द तयार झाले; परंतु दोघांचे घर कधी बनलेच नाही. अमृताने एकदा साहिरला विचारले की प्रेम म्हणजे काय रे – तेव्हा तो बोलला काहीच नाही, पण कागदावर उतरले त्याचे मन…
मेरे दिलमें आज क्‍या है, तू कहे तो मैं बता दूं
तेरी जुुल्फ फिर सवारू, तेरी मांग फिर सजा दूं
साहिर, अमृताच्या या प्रेमाची गोष्ट कधीच संपली नाही. ते सफल झाले नाही पण अजरामर झाले. प्रेमाची ही वेगळी वाट दोघांनी आपल्या मनाप्रमाणे चोखाळली. आपल्या असफल प्रेमाची खंत दोघांनीही शेवटपर्यंत जपली. इमरोज आयुष्यात आल्यानंतरही अमृता साहिरला विसरली नाही. पण साहिर कुठेतरी दुखावला गेला आणि शेवटी अमृताला म्हणाला,
चलो इकबार फिरसे,
अजनबी बन जाए हम दोनों…
अमृता राज्यसभेच्या सभासद झाल्यावर, त्यांना रोज गाडीतून नेण्या-आणण्याचे काम इमरोजने चोख केले. सहा दशकांपूर्वीचं हे प्रेम म्हणजे न डगमगता केलेला एक विद्रोहच होता. साहिरच्या मृत्यूनंतर अमृता त्या दुःखातून कधीच बाहेर आल्या नाहीत. त्या आजारी पडल्या. त्या आजारपणात इमरोजने त्यांची मनापासून सेवा केली. या प्रसिद्धीपुढे हा मोठा चित्रकार झाकोळलेलाच राहिला.
अमृताने “अमृता इमरोज अ र्ङीेंश डीीूं’ हे पुस्तक लिहिलं. एकूण 100 पुस्तकांची निर्मिती करणारी अमृता नेहमीच स्वतःच्या विचारानुसार मुक्तपणे जगली. अमृता इन्सानियत जपते आणि शेवटी इमरोजना म्हणते-
मैं तुम्हे फिर मिलूंगी
कहॉं किस तरह, ये नही जानती
शायद चिंगारी बनकर
तुम्हारे कॅनव्हासपर उतरुंगी
या एक रहस्यमय रेखा बनकर खामोश तुम्हे
देखती रहूँगी- देखती रहूँगी
खरंच येईल का ती परत…???

-आरती मोने

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.