women’s day 2021: प्रत्येक दिवस व्हावा महिला दिन…

महिलादिन अगदी काही तासांच्या अंतरावर आलाय; तयारी, गडबड चालू आहे, तिच्यासाठी एक दिवस खास बनवण्याची असंख्य शुभेच्छांनी तिचा मोबाईल तुडुंब भरेल. घरात एरवी तिची किंमत न करणारे आवर्जून तिचे फोटो टाकतील,

देवी, रणरागिणी, घराची स्वामीनी म्हणून तिच्यावर स्तुतीसुमने उधळतील, एखाद-दुसरं गिफ्ट तिच्या हाती नक्कीच पडेल. कौतुकाच्या पोस्ट पाहून तिचे मन उबगले तरी ती आनंदानेच त्याचा स्वीकार करेल, कारण तिला माहीत आहे, पुन्हा वर्षभर हे प्रेम कौतुक तिला क्वचितच मिळेल अन्‌ ती वाट पाहत राहिलं पुन्हा येण्याऱ्या महिला दिनाची

दुसरा दिवस उजाडेल तसें ती आनंदाने स्वयंपाक घरात राबताना दिसेल, नवऱ्याचा सकाळचा डबा, मुलांना शाळेत नेऊन सोडण्याची घाई, सासू-सासऱ्यांची काम, घाई घाईत सगळे करता-करता स्वतः नाश्‍ता करायला तर जवळपास रोजच विसरते ती. दिवस राबराब राबण्यात, सगळ्यांच्या आवडी जपण्यात जाईल. नवरा ऑफिसमधून घरी येतो जरा काही झाले की राग तिच्यावर निघतो..घरी बसून काम असतात तुला? तिच्या डोळ्यात टचकन पाणी येईल.

अन अपराधीपणाने वाट पाहते कालच साजरा केलेल्या महिलादिनाची…
तिची रोजची धावपळ सकाळचे ऑफिस, डबा करायला बाई येते पण तीही बाईच, नवरा एखाद्या दिवशी दारू पिऊन बेदम मारतो दुसऱ्या दिवशी कामासाठी त्राणच उरत नाहीत मग तिची सुट्टी होते. काम ती करते निमूटपणे, डबा, मुलांचे, करून धावत-पळत ऑफिस गाठते. ऑफिसमधे बॉस उशीर झाला म्हणून ओरडतो तर एखाद्या दिवशीसुद्धा तुला घर नीट सांभाळता येतच नाही, म्हणून नवरा ओरडतो. खंबीरपणे ती उभी राहते पण पुन्हा उगीच वाट पाहते कालच साजरा केलेला कौतुकदिनाची अर्थात महिला दिनाची…

तिला तर स्वप्नच नाहीत, एका दलदलीत अडकलेली ती, असह्य होऊन देह विक्री करते,कोणाच्या तरी वासना तिथे पूर्ण करून ती हात पुढे करते, पोटापाण्याच्या विवंचना दूर करण्यासाठी अन्‌ तो पुन्हा तिला स्पर्श करतो. यावेळी तो स्पर्श तिला किळसवाणा वाटतो.

ती त्याला झिडकारते, तसा तो कानाखाली मारत तिची लायकी दाखवत चार शिव्या देतो. अर्धेच पैसे देऊन तो निघतो. ती, सुजलेला गाल आणि डोळ्यातून येणारे अश्रू विसरून, त्याच्या वृत्तीवर तिनेही मारलेली चपराक पाहून क्षणभर समाधानाने हसते. महिला दिन काय असतो तीच्या गावीही नसते पण कोणी तरी,एखादा गिऱ्हाईक एखादं चॉकलेट देऊन,तिला महिलादिनाच्या शुभेच्छा देतो अन ती वर्षभर या क्षणाची वाट पाहते आतुरतेने…

समाजाच्या खिडकीत ती नेहमीच आपले अस्तित्व शोधण्याचा प्रयतक्‍ ती करते.
तिच्यासाठी समाजाने बनवलेली एक खिडकी तिला बाहेर डोकावून तर पाहू देते, पण बाहेर पडू देत नाही हेच खरं… एक जादुई खिडकी द्याल का तिला, जिथे ती कोणत्याही विवंचना, अंधश्रद्धा घेऊन उभी न राहता, स्त्री असण्याचा सोहळा करेल, तिथेच उभी राहून ती पुन्हा स्त्री जन्मच हवा म्हणून आकाशीच्या देवाला हात जोडत असेल.

तिला जपा, तिला फुलू द्या, तिला उडू द्या, तिचा सन्मान करा तिला खरं तर जगू द्या…
मग एकही महिला “दीन’ न होता खऱ्या अर्थाने तो सुदिन महिला दिन होईल.
आणि मग कोणता एक दिवस नाही तर रोजच ती महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.