वडगाव मावळ, दि. 28 – दुय्यम निबंधकांनी दस्ताची नोंदणी करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने विषारी द्रव्यपदार्थ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटनासोमवारी (दि.28) वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात घडली. किरण शांताराम भोसले (रा. बारामती) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने प्रशासन व पोलिसांची एकच धावपळ उडाली.
पवन मावळातील बेडशे येथील जमीन खरेदीचे दस्त नोंदणी करण्यासाठी किरण भोसले हे सोमवारी म(दि.28) वडगाव मावळ येथील दुय्यम कार्यालयात आले होते. भोसले हे खरेदी करत असलेली जमीन ही खाजगी वनीकरण असलेली होती. तसेच या मिळकतीचे त्यांनी चुकीचे मूल्यांकन केले असल्याने दुय्यम निबंधक संतोष जनार्धन कराळे यांनी हा दस्त नाकारला होता. दस्त नाकारल्याच्या कारणावरून किरण भोसले यांनी फिनेल नावाचे विषारी द्रव्य पदार्थ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसानी वेळेत घटनास्थळी धाव घेऊन भोसले यांना पुढील उपचारासाठी सोमटणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
या संदर्भात किरण भोसले यांनी दुय्यम निबंधक यांना लेखी पत्र देत त्यात असे म्हटले आहे की, भोसले हे बेडसे येथील विकत घेत असलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात वनीकरणाचा शेरा असल्याने दुय्यम निबंधक हे दस्त करून देण्यास मागील आठ महिन्यांपासून टाळाटाळ करत होते. मात्र या बाबत शासनाची कोणतीही हरकत नसल्याचे परिपत्रक आम्ही जोडून देखील दस्त नोंदणीस विनाकारण टाळाटाळ करून पैशांची मागणी करत असल्यामुळे मी आपल्या समोर विष पिऊन आत्महत्या करत आहे.