जालना – 14 वर्षीय मुलीने आपल्या पाच वर्षीय चुलत बहिणीचा ब्लेडने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलीला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वरी भोसले (वय 7 वर्ष) असे मयत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील चौधरीनगर भागात 7 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा फोन 112 क्रमांकावर आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चिमुकलीला शहरातील संतकृपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी रुग्णालयात तात्काळ धाव घेतली. यावेळी ईश्वरीच्या हातावर, गळ्यावर जखमा झाल्याचे दिसले. तसेच ईश्वरीच्या चेहऱ्यावरदेखील वार करण्यात आले होते. दरम्यान, ब्लेडने वार केल्याने ईश्वरीच्या शरीरावर जखमा होऊन मोठा रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या आधीच तिचा मृत्यू झाला. आरोपी मुलीने ईश्वरीची हत्या का केली यासंदर्भात स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सकाळी 8 वाजताच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी गेली असता तिच्यामागे आरोपी मुलगी गेली. तिने बाथरूमचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर ईश्वरीच्या गळ्यावर, हातावर, शरीरावर ब्लेडने वार केले. रक्ताचा सडा बाथरूममध्ये पडला होता. ईश्वरीच्या किंचाळण्याच्या आवाजाने घरातील व्यक्ती बाथरूमजवळ आले मात्र आतून दरवाजा लावून घेतला होता. बाथरूममधील रक्त साफ करून आरोपी मुलीने दरवाजा उघडला.
खरपुडी रोडवरील एका इंग्लिश शाळेत ईश्वरी युकेजीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती. ईश्वरीचे आई-वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. त्यामुळे ती आपल्या चुलत्याकडेच राहत होती. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. आज सोमवारी सकाळी ईश्वरी शाळेत जाणार होती. 8 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही अंघोळीसाठी करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.