शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यांचा ‘वॉच’

ऊसटंचाईमुळे कारखानदारांची दमछाक होणार : जिल्ह्यातील उसाची होणार पळवापळवी?

योगेश मारणे
न्हावरे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत एफआरपीसह 200 रुपये जादा, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा उसाचे घटते उत्पादन, दुष्काळ, महापुराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा जादा दर मिळणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, दौंड, पूर्व हवेली आदी तालुक्‍यात उसाचे क्षेत्र लक्षणीय आहे. मात्र, सत्तेच्या सारीपाटावर सर्वच राजकीय पक्ष मश्‍गूल आहेत.

जिल्ह्यात विशेषत: इंदापूरसह बारामती, आणि दौंड तालुक्‍यातील सर्वच कारखान्यांना गाळपाची सरासरी गाठण्यासाठी नाकीनऊ येणार आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30 ते 35 लाख टन गाळप कमी होईल, असा अंदाज आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून जिल्ह्यातील ऊस पट्टा हा दुष्काळ आणि ओल्या दुष्काळात होरपळत आहे. पहिल्यांदा पाच महिने ऊस जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. त्यानंतर परतीचा पाऊस आणि वादळी तडाखा यात ऊस भुईसपाट झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्‍यात ऊस क्षेत्रात घट झाली आहे, याचा फटका कारखान्यांना बसणार आहे.

मॉन्सून सुरू झाल्यानंतर जुलैपर्यंत समाधाकारक स्थिती होती. त्यात इंदापूर तालुका हा अपवाद होता. जिल्ह्यातील अनेक गावांत पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यानंतर परतीचा मॉन्सून सुरू झाल्यानंतर पावसाचा फटका बसला. आडसाली ऊस लागवडीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिरिक्‍त पावसामुळे आडसाली ऊस कुजून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी वीस ते पंचवीस हजार रुपयांचा फटका बसला आहे.

आडसाली लागवडीचा खर्च परतीच्या पावसात धुऊन गेला आहे. त्यामुळे पुन्हा ऊस लागवड करण्याची वेळ आली आहे. आडसाली ऊस लागवड ही उत्पादनासाठी पोषक समजली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील तसेच विहिरी, कूपनलिकांची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून आडसालीची लागवड केली जात होती, मात्र, परतीच्या पावसात हा ऊस कुजून गेला आहे. जिल्ह्याशेजारी सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होऊ शकते. त्यामुळे कारखानदारी धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

“सहकारा’ची खासगी कारखान्यांशी स्पर्धा
पुणे जिल्ह्यात सरासरी 13 साखर कारखाने आहेत. तसेच चार ते पाच खासगी कारखान्यांनी बस्तान बसविले आहे. जिल्ह्यात गाळप हंगामात सहकारी कारखानदारी आघाडीवर असली तर खासगी कारखान्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. सहकाराखालोखाल खासगी कारखान्यांची गाळपांची टक्‍केवारी आहे. त्यामुळे यंदा सहकारी कारखान्यांना खासगी कारखान्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

पुणे जिल्ह्याला तीन जिल्ह्यांचा धोका
यंदा राज्यात उसाची टंचाई तीव्र स्वरूपात भेडसावणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील 100 लाख टन महापुरात कुजला आहे. याची झळ ही सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना बसली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याशेजारी असलेल्या सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने पुणे जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी येण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.