Success Story । डॉक्टर प्रताप रेड्डी यांचे नाव भारतातील सर्वात मोठी यशस्वी रुग्णालयांची चेन उभारणारे उद्योजक म्हणून घेतले जाते. प्रताप चंद्र रेड्डी हे एक भारतीय उद्योजक आणि हृदयरोगतज्ज्ञ आहेत त्यांनी भारतातील हॉस्पिटल्सची पहिली कॉर्पोरेट शृंखला, अपोलो हॉस्पिटल्सची स्थापना केली. इंडिया टुडेने भारतातील 50 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या 2017 च्या यादीत त्यांना 48 वे स्थान दिले आहे.
निवृत्तीचे वय साधारणपणे पन्नाशीच्या अखेरीस किंवा साठीच्या मध्याला असावे असे मानले जाते. बहुतेक जण या काळात निवृत्त होतात. परंतु काही जणांसाठी मात्र नव्वदी उलटली तरी कार्यरत राहणे हेच जीवनकार्य असते. त्याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे देशातील सर्वाधिक वयाचे अब्जाधीश डॉक्टर प्रताप सी. रेड्डी. आता त्यांचे वय 91 वर्षे आहे आणि निवृत्ती ऐवजी ते आठवड्यातून सहा दिवस कंपनीच्या कार्यालयात जाऊन कामकाज पहात असतात.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राईजेस या कंपनीचे मालक असलेल्या डॉक्टर रेड्डी यांनी सातत्यपूर्ण कष्टातून ही कंपनी उभी केलेली आहे. आज या कंपनीचे बाजार भांडवल 69 हजार 700 कोटी रुपयांच्या आसपास आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या या कंपनीतील 29 टक्के शेअर्स रेड्डी कुटुंबीयांकडे आहेत. गेली 40 वर्ष मोठ्या मेहनतीने डॉक्टर रेड्डी यांनी ही कंपनी स्थापन केली आहे. कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयात ते आजही सकाळी दहा ते पाच या वेळेत उपस्थित असतात. आठवड्यातून सहा दिवस ते नियमितपणे कार्यालयात येतात.
आज आरोग्य क्षेत्रातील त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. त्यांच्या चार कन्या डॉक्टर प्रीती रेड्डी, कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सन सुनीता रेड्डी, कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरपर्सन शोभना कामिनेनी आणि कंपनीच्या संयुक्त व्यवस्थापक संचालक संगीता रेड्डी या चौघीजणी कंपनीचे नियमित कामकाज पाहतात. कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने चालवले जावे यासाठी डॉ. प्रताप रेड्डी यांनी दुसरी पिढी तयार केली आणि आता अपोलो ग्रुप साठी ते तिसरी पिढी घडवण्यासाठी सक्रिय आहेत.
त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या दुसऱ्या पिढीने अपोलो समूहात 21 ब्रँड्स स्थापित केले, 71 रुग्णालये, पाच हजार औषधांची दुकाने आणि 291 प्रायमरी केअर क्लिनिक सुरू केली. त्याखेरीज डायग्नोस्टिक चेन, मॅटर्निटी सर्विसेस आणि डिजिटल हेल्थ पोर्टल आदी सेवा देखील सुरू केल्या. एक बुद्धिमान व्यावसायिक म्हणून डॉक्टर प्रताप सी. रेड्डी कार्यरत आहेत, त्याचबरोबर या व्यवसायाची धुरा पुढील पिढीकडे सोपविण्यासाठी त्यांनी अतिशय व्यावहारिक व्यवसाय हस्तांतर योजना आखून ती प्रत्यक्षात आणल्यामुळे सहजपणे नवी पिढी व्यवसाय सांभाळत आहे. त्यासाठी नव्या पिढीमध्ये नेतृत्व गुण त्यांनी जाणीवपूर्वक विकसित केले.
हे सगळे करण्यासाठीच ते आजही वयाच्या 91 वर्षी रोज कार्यालयात उपस्थित असता.त अब्जाधीश असणाऱ्या डॉक्टर रेड्डी यांची दहा नातवंडे देखील आता या व्यवसायात कार्यरत आहेत. डॉक्टर रेड्डी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे, की त्यांनी त्यांच्या नातवंडांना बोलावून त्यांना कुठल्या कामात आवड आहे आणि त्यांची बलस्थाने काय आहेत हे विचारले होते आणि त्यानुसार त्यांनी नातवंडांना की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया म्हणजेच केआरए निश्चित करून दिलेले आहेत. त्यातूनच अपोलो समूहासाठीची तिसरी पिढी तयार होत आहे
हेही वाचा
मोदींबाबत ‘ते’ शब्द वापरल्याने निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिला मोलाचा सल्ला,’शब्द जपून वापरा …’