यशोगाथा माणदेशी महिलांची : माणदेशीच्या प्रेरणेने मेहनत घेत ‘सरला गिते’ झाल्या स्वावलंबी

– श्रीकांत कात्रे

माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या संस्थांनी ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहयला शिकवले. सरला गिते त्यापैकीच एक. माणदेशीच्या शेळी सखी प्रकल्पातून त्यांनी कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून दिली.

शेती आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सरला गिते यांचे जगणे माणदेशीमुळे बदलून गेले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्‍यातील ब्राह्मणवाडी गावातील सरलाताई यांनी माणदेशीच्या शेळी सखी प्रकल्पातून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक हातभार लावला. माणदेशीच्या प्रतिनिधी भेटल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर काही प्रशिक्षण घेऊन काम करून स्वावलंबी बनण्याचे निश्‍चित केले.

गावातील 50 महिलांना माणदेशीने वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले. त्याचवेळी शेळी सखी प्रकल्पाविषयी माहिती देऊन माणदेशीकडून प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व महिलांना या प्रकल्पात काम करण्यात रस आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी हे काम करण्यस कोणीही तयार झाले नाही. सरलागिते यांनी मात्र हे काम करण्याची तयारी दाखवली. डबा घेऊन गावोगावी फिरून शेळ्यांचे लसीकरण व प्रथमोपचार करावे लागतील, असे सांगितल्यावर त्यांनी होकार दिला.

मग या कामाचे प्रशिक्षण मिळाले. आणि सहा महिन्यांनंतर 23 नोव्हेंबर 2018 पासून हे काम त्यांनी स्वीकारले. शेळी किंवा कोंबड्यांचे लसीकरण, त्यांच्यावर प्रथमोचार करणे आणि कृत्रिम रेतन करणे या स्वरूपाचे काम शेळी सखींच्यामार्फत केले जाते. परिसरातील सुमारे 40 गावांमध्ये हे काम त्या करतात. शेळीपालन आणि कुकुटपालन या व्यवसायासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देताना प्रामुख्याने शेतकऱ्यांना लसीकरणाचे आणि कृत्रिम रेतनाची माहिती द्यावी लागते,

हे केल्यामुळे उत्पादन वाढते, चार पैसे जास्त मिळतात, असे शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. महिला म्हणून काम करताना सुरवातीला भीती वाटायची, विशेषतः शेती किंवा मजुरी करण्यापेक्षा हे काम खूप वेगळे होते. लोकांशी बोलायला भीती वाटायची. पण आता सर्व लोकांमध्ये धाडसाने वावरत त्या काम करतात. माणदेशीने ही आगळी शक्ती निर्माण केली असल्याचे त्या नमूद करतात.

मात्र, हे काम फिरतीचे आणि खूप कष्टाचे, मेहनतीचे. कधीही कामासंदर्भात फोन आला की जायचे. त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन झाला. कामासाठी कंटेनर घेऊन बसने किंवा रिक्षाने गावोगावी त्या जातात. आता फिरतीसाठी आणि वेळ वाचविण्यासाठी त्या दुचाकी घेणार आहेत. माणदेशीच्या पाठिंब्यामुळे सारे शक्‍य झाले आहे,

असे सांगून पुढील काळातही माणदेशीच्या प्रोत्साहनानेच सारी स्वप्न पूर्ण करणार असल्याचा आत्मविश्वास त्या व्यक्त करतात. माणदेशीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागली. केवळ माणदेशीफनेच स्वावलंबी बनण्यासाछी प्रोत्साहन दिले, असे त्या सांगतात. कृत्रिम रेतन कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यासाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाशी माणदेशी फाउंडेशनने सामंजस्य करार केला आहे.

या करारांतर्गत शेळी व मेंढीपालनाबाबत इतर विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्याचा विचार फाउंडेशन करीत आहे. यामध्ये माणदेशीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या शेळी सखींमार्फत महाराष्ट्रातील शेळ्यांमध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी सांगितले.

शेळीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाउंडेशनने 2014 पासून शेळीपालन व कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविला. फाउंडेशन 18 तालुक्‍यांमध्ये हा उपक्रम राबवत आहे, असे फाउंडेशनच्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले. आतापर्यंत माणदेशी फाउंडेशनने शेळी व मेंढीपालन उपक्रमासाठी 1385 गावे कव्हर केली आहेत.

11789 शेळ्यांना कृत्रिम रेतन केले आहे. 5, 42, 513 मेंढ्या व कोंबड्यांना लसीकरण केले. 4, 47, 969 शेळ्यांना लसीकरण केले. 1,04,364 शेळ्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

==========

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.