पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात येणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आयोजित शिबिरास भूधारकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मौजे वाकड, तळवडे, चिखली भागातील रस्त्याची जागा पालिकेकडून ताब्यात घेण्यात आली. त्यावेळी नगररचना विभाग व स्थापत्य विभागाकडून जमीन मालकांना अ व ब प्रपत्र देण्यात आले. जागा ताब्यात आल्यामुळे रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे स्थापत्य विभागाकडून कळविण्यात आले.
नुकतेच पुनावळे आणि चिखली गावठाण येथे शिबिर घेण्यात आले. बाधित शेतक-यांना जागेचा ताबा दिल्यानंतर अ व ब प्रपत्र सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मौजे वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी व किवळे येथील मंजूर विकास योजनेमधील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस १२ मी. सेवा रस्त्याची जागा ताब्यात घेण्यात आली.
चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठाकडे जाणारा १२ मी व १८ मी रुंद डीपी रस्ता, चिखली येथील साने चौक ते चिखली गाव १२ मी, २४ मी व ३० मी रुंद रस्ता, चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा ३० मी रुंद डीपी रस्ता, चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा २४ मी रुंद रस्ता, तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मी रूंद उर्वरित रस्ता, तळवडे येथील तळवडे कॅनबे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा १८ मी डीपी रस्ता आणि तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा १२ मी रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील २४ मी रस्त्याचे भूसंपादन करण्यात आले.
सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमीन मालक व विकसक जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते. नगररचना विभागाने तयार केलेला नकाशा पाहून आपली जागा रस्त्यात येत असल्याची खात्री केल्यानंतर कागदपत्रे सादर करुन जागेचा आगाऊ ताबा देण्यास जागा मालकांनी प्रतिसाद दिला. पालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे अ व ब प्रपत्र जमीन मालकांना दिले.
दोन्ही ठिकाणी जागेच्या मालकांनी उर्वरित क्षेत्र ही लवकरच पालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी दर्शविली. या शिबिरामध्ये काही कारणास्तव उपस्थित न राहता आल्यामुळे अ व ब प्रपत्र न मिळाल्यास संबंधित जमिनमालकांनी पालिकेतील नगररचना व विकास विभागात कार्यालयीन वेळेत संपर्क साधल्यास त्यांना अ व ब प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले.