मार्ग सुरू होण्यासाठी मार्च 2020 उजाडणार
पुणे – मेट्रो प्रकल्पाचे काम नियोजित वेळेपेक्षा अधिक गतीने सुरू असल्याचा दावा करत दि.31 डिसेंबरपूर्वी प्राधान्य मार्गावर 12 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू करण्याचा दावा महामेट्रोने केला होता. मात्र, गेल्या वर्षभरात प्रकल्प रेंगाळल्याने हे काम 70 टक्केच पूर्ण झाले असून मेट्रोने निश्चित केलेली डेडलाइन हुकणार आहे. तर, डिसेंबरमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा दावाही फोल ठरला असून, प्राधान्य मार्गावर मेट्रो धावण्यासाठी मार्च-2020 उजाडण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 2016 मध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांत प्रत्येकी एक प्राधान्य मार्ग डिसेंबर 2019 मध्ये सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार मेट्रोला आवश्यक जागा, परवानग्या दोन्ही महापालिकांनी दिल्या, तर केंद्र आणि राज्य शासनानेही निधीचा “बूस्टर’ दिला. यानंतर मेट्रोने आपला मार्ग सुरू करण्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला. त्यात वनाज-गरवारे महाविद्यालय हा 5 आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी असा 7 किलोमीटरचा प्राधान्यक्रम निश्चित केला. त्यानंतर हे दोन्ही मार्ग नियोजित वेळेत सुरू होण्याचे दावेही मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केले
“पुणेकरांना 2019 मध्ये मेट्रोमध्ये बसता येईल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केला होता. त्यानंतर, महामेट्रोने उन्नत मार्गांची (एलिव्हेटेड) आणि स्टेशनची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले. आता निम्मा नोव्हेंबर संपल्यानंतरही दोन्ही प्राधान्य मार्गांवर सरासरी 60 ते 70 टक्के कामे पूर्णत्त्वास गेली आहेत. पुढील दीड महिन्यांत प्रामुख्याने मेट्रोसाठीचे सर्व बांधकाम (सिव्हिल वर्क) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली.
अनेक कामे अर्धवटच
मेट्रोकडून डिसेंबर अखेरपर्यंत हे दोन्ही मार्ग सुरू करण्याचे दावे करण्यात आले, तरी आपली “डेडलाइन’ हुकणार, हे लक्षात येताच मेट्रोने पिंपरी-चिंचवडमधील मार्ग प्राधान्याने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता या मार्गात नाशिक फाटा चौकातील काम अजून अपूर्ण आहे. संत तुकारामनगर आणि फुगेवाडी या दोन्ही स्टेशनची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे या मार्गावरही मेट्रोची “ट्रायल रन’ नवीन वर्षातच होणार असल्याची शक्यता बिऱ्हाडे यांनी व्यक्त केली.