मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपुढे शेतकऱ्यांचा ‘गळफास’ दिसेना

माळेगाव – राज्यातील राजकारणांची समीकरणे कशी आणि केव्हा जुळून येतील, हे कळायला मार्ग नाही. मात्र, अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. यंदाच्या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्याने व त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळेल याची शाश्‍वती नसल्याने अन्नदात्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यातील अनेक भागात सततची नापीकी आणि कोरड्या, ओल्या दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव उघड असताना सत्ता स्थापनेचा घोळ सुरू झाल्या त्या “105 वाल्या’ राज्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपुढे शेतकऱ्यांच्या गळ्याला लागणारा गळफास दिसत नाही का? असा संतप्त सवाल बारामती उपविभागातील शेतकऱ्यांकडून होऊ लागला आहे.

बारामती उपविभागातील शेतकरी हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावल्याने हवालदील झाला आहे. काढणीला आलेले व काढलेले पीक परतीच्या पावसाने पुन्हा शेतातच भिजल्याने शेतकऱ्यांच्या काबाड कष्ठासह त्यांचे पीक वाया गेले आहे. बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या भागातील 82 हजार 128 शेतकऱ्यांचे 43 हजार 731 हेक्‍टर शेतीक्षेत्र अवकाळी पावसाने बाधीत झाले आहे. सध्या, पेरण्यांचा मोसम सुरु आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे असले तरी नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बारामती तालुक्‍यातील “शेतीचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या 5 हजार 628 शेतकरी संख्या असलेल्या मळद गावात सोयाबीन, मका, कडवळ, ऊस, वांगी, भेंडी यासारखी पीके घेतली जातात. मात्र, यावेळी पडलेल्या अवकाळी पावसाने गावातील शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे.

या भागात शेतकऱ्यांनी घेतलेल्या 40 ते 50 एकर सोयबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन पावसाने भिजून पुन्हा त्याला कोंब फुटले आहेत. 10 टक्के ही सोयबीन पिकाचे उत्पादन गावात होणार नसल्याचे सांगून झालेल्या नुकसानीचे किमान 75 टक्के मदत व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या चार ही तालुक्‍यातील ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तालुका स्तरावरुन पंचनामे करुन एकत्रित अहवाल तयार करण्यात आला आहे. या चार तालुक्‍यातील 461 गावातील 82 हजार शेतकऱ्यांच्या 43 हजार 731 शेती क्षेत्राचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येणार असून आलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार आहे.
– बालाजी ताटे, उपविभागीय कृषिअधिकारी, बारामती

पंचनामे करून आठ दिवस झाले. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. 40 ते 50 एकर सोयाबीन तसेच 10 एकर वांगी पीक पूर्ण पणे वाया गेले आहे. एकरी 4 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, आता निम्मंही उत्पन्न मिळणार नाही. सरकार स्थापन झाले नसल्यामुळे नुकसान भरपाईची आशा मावळली आहे. पुढील पीके कशी घ्यावीत, याची काळजी लागली आहे.
– अविनाश गावडे, शेतकरी, बारामती

तीन एकर क्षेत्रात 30 क्विंटल सोयबीनचे उत्पन्न नेहमी मिळते. परंतु, या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून शून्य उत्पादन मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.
– मंदाबाई घाडगे, शेतकरी, मळद

दरवर्षी 30 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते. मात्र, अवकाळी पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजल्यामुळे निम्मही उत्पन्न मिळेल की नाही, अशी परिस्थिती आहे. पंचनामे झाले असून लवकरात लवकर मदत मिळण्याची आशा आहे.
– बबनराव विठ्ठल घाडगे, शेतकरी, भैय्यावस्ती, बारामती

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)