सिलिंडरवरील अनुदानासाठी ग्राहक “गॅस’वर

पैसे जमा होण्यास लागतोय महिनाभराचा कालावधी : कारण अस्पष्ट

पुणे – घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान थेट बॅंक खात्यामध्ये जमा होत असल्याने नागरिकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. मात्र, आता त्यावरील अनुदान मिळण्यास महिना लागत आहे. त्याचबरोबर सिलिंडरवरील एक महिन्यातील अनुदान बॅंक खात्यामध्ये जमा होत नसल्याचे प्रकार घडत आहे.

शहरात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन तेल कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने त्यावरील अनुदान (सबसिडी) थेट बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची योजना लागू केली. त्यासाठी नागरिकांनी बॅंक खाते उघडून त्याची माहिती गॅस एजन्सीकडे जमा केली. त्याचबरोबर आधार क्रमांकसुद्धा बॅंक खात्याशी लिंक केले. बुकिंग केल्यानंतर घरी सिलिंडर मिळाल्यावर नागरिकांना सिलिंडरचे बाजारभावानुसार पैसे द्यावे लागतात. त्यानंतर ग्राहकांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा होते.

मात्र, बहुतेक वेळा हे अनुदान बॅंकेत जमा होण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही वेळेस अनुदान जमा होण्यास महिना लागत आहे. तसेच एखाद्या महिन्यात अनुदान जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. याविषयी गॅस एजन्सीकडे विचारणा केल्यास “बॅंकेमध्ये चौकशी करा’ असे उत्तर देतात. तेथे विचारल्यास बॅंकेमधील कर्मचारी “गॅस एजन्सीकडे जा’ असे सांगतात. त्यामुळे दोन्ही संस्था एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने याविषयी विचारणा कोठे करायची? असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.