वंचित बहुजन आघाडीचे साताऱ्यात घंटानाद आंदोलन

लोकसभेच्या 48 जागांवर बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी
सातारा – राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर मतांच्या संख्येमध्ये फेरफार झाला असून सर्व जागांवर बॅलेट पेपरव्दारे फेरनिवडणूका घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर झालेले मतदान आणि ईव्हीएमव्दारे मोजलेली मतांमध्ये तफावत दिसून येत आहे. त्याबाबत वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांनी निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवत 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र, आयोगाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. राज्यातील 22 जागांमध्ये ईव्हीएमपेक्षा उमेदवारांना अधिक मते मिळाली आहेत. तर 26 मतदारसंघामध्ये ईव्हीएमवरील एकूण मतांपेक्षा कमी मते उमेदवारांना मिळाल्याचे उघड झाले आहे.

त्याबाबत निवडणूक आयोगाच्या वेबसाईचे स्क्रिन शॉट काढून आयोगाला पाठविण्यात आले. मात्र, तरी देखील आयोगाकडून कोणतेही उत्तर देण्यात येत नाही. आयोगाच्या कार्यपध्दतीवरून मतदारांच्या मतांची खुलेआम चोरी झाली असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर सत्तेवर आलेले सरकार नियमानुसार स्थापन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने स्वत: पुढाकार घेवून न्यायालयाच्या माध्यमातून कारवाई करणे गरजेचे आहे. तरी देखील आयोगाने पाऊले न उचलल्यास मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरून विश्‍वास उडणार आहे. त्यामुळे तात्काळ 48 जागांवर बॅलेटपेपरव्दारे फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी चंद्रकांत खंडाईत, पार्थ पोळके, गणेश भिसे, संदिप कांबळे, भरत लोकरे, विशाल भोसले, विजय गडांकुश, सुधाकर काकडे, बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.