जर्मन विद्यार्थ्यांकडून “भारतीय सिनेमा’चा अभ्यास

पुणे – भारतीय चित्रपटाला अनेक दशकांचा दैदीप्यमान इतिहास आहे. अनेकदा भारतामध्ये चित्रपट तयार करताना परदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यंदा मात्र “जर्मनी’मधील विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. “फिल्म अकादमी बॅडेन-वूटनबर्ग’ (एफएबीडब्ल्यू) येथील 12 विद्यार्थी “भारतीय सिनेमा’चा अभ्यास करण्यासाठी “फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया’ (एफटीआयआय) येथे आले आहेत. “एफटीआयआय’ येथील अभ्यासक्रमासह हे विद्यार्थी मुंबईमध्ये चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत.

जर्मनीमध्ये निर्मिती, संकलन, छायांकन, नाट्य, चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, पत्रकारिता आदी विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहेत. “भारतीय चित्रपट आणि त्याची उत्क्रांती’ या अभ्यासक्रमामध्ये भारतीय चित्रपटांची निर्मिती, संगीत रचना, अभिनय, नृत्य दिग्दर्शन या विषयांचा समावेश आहे.

पुण्यातील अनुभव चांगला होता. आमच्याबरोबर असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना येथील हवामान अनुकूल नसल्याचे अनेकजण आजारी देखील पडले. सुरुवातीच्या काळात थोडा थकवा जाणवला. पण हा अनुभव “क्रेझी’ होता. आम्हांला येथे भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थांमध्ये खूप विविधता जाणवली, असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये भारतामध्ये चित्रपट निर्मिती करायला, आम्हाला नक्‍की आवडेल असे म्हणत प्रतिसाद दिला. तर चित्रपट तयार करण्यासाठी आम्ही सहकार्य नक्‍की करू असे नमूद केले. परंतु, शहरातील वाहतुकीबाबत त्यांनी काही अंशी नाराजी व्यक्‍त केली.

इतकेच नव्हे तर गणेशोत्सवाचे या विद्यार्थ्यांनी चित्रीकरण केले आहे. याचे माहितीपटात रुपांतर होणार आहे, असे “एफटीआयआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कॅन्थोला, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम, समन्वयक पंकज सक्‍सेना, कला दिग्दर्शन विभागाचे प्रमुख विक्रम वर्मा यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमाचे उद्‌घाटन झाले.

जर्मन विद्यार्थ्यांची भेट “एफटीआयआय’ आणि “एफएबीडब्ल्यू’ यांच्यातील करारानुसार झाली. चित्रपटांतील विविधता, सांस्कृतिक वैविध्य, सिनेमांची निर्मिती यामुळे भारतीय चित्रपटांचे जगामध्ये “अनोखे’ स्थान आहे. एफएबीडब्ल्यूशी सल्लामसलत करून या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.
– भूपेंद्र कॅन्थोला

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×