चाकण : नाशिक रस्त्यावर असणा-या वाकी बु. येथे रस्त्याच्या खालून जाणारा मोठा ओढा आता पूर्णपणे बुजविण्यात आला असून तेथे नावाला मोठे पाईप टाकून त्याद्वारे पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाकी येथे चाकण बाजूकडून खेडकडे जाताना असणाऱ्या डावीकडील ओढा पूर्णपणे तुंबला असल्याकारणाने पावसाचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडून कसरत करावी लागली. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व प्रवाशांनी केला आहे.