पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली आहे. या यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी आजच (दि.16) प्रवेश घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी 12 जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. यात प्रथम पसंतीक्रमाद्वारे 24 हजार 364 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी 13 जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे धावही घेतली.
विद्यार्थ्यांनी आजच सकाळी 11 ते 3 यावेळेत महाविद्यालयात जावून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन अपलोड करून प्रवेश दिल्याची प्रिंट विद्यार्थ्यांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्र नसल्यास त्याबाबत स्वत: खात्री करून वेळेत कागदपत्रे सादर करण्याबाबत विद्यार्थी व पालक यांची हमीपत्रे घेऊन प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याची तक्रार कार्यालयाकडे येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांवरच राहणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत योग्य त्या सूचना महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांनी सूचनांनी अंमलबावणी करण्याची आवश्यक आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशाच्या रिक्त राहणाऱ्या जागांनुसार प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाच्या जागांची निश्चित माहिती समोर येणार आहे.