पुणे – राज्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या व शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडच्या संचालकाकडे करण्यात आली आहे.
सन 2018 व 2019च्या शासकीय रेखाकला परीक्षेचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय संबंधित माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून इंटरमिजिएटचे सवलतीचे गुण मिळण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याची बाब कला संचालनालयास निदर्शनास आली आहे. त्यास अनुसरुन 2018 मधील एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांच्या प्रमाणपत्रांची छपाईच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही सुरु असून प्रमाणपत्र छपाई करुन वितरीत करण्यास किमान 4 ते 6 महिन्याचा कालावधी लागणार आहे.
सन 2019ची शासकीय रेखाकला परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे ही परीक्षा 27 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला बसलेले विद्यार्थीही सवलतीच्या गुणांसाठी पात्र ठरतात. या परीक्षेच्या उत्तपत्रिका मूल्यमापनासाठी परीक्षक समालोचक यामना मुख्याध्यापकांनी कार्यमुक्त न केल्यामुळे उपलब्ध परीक्षक व समालोचक यांच्याकडून उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे काम पूर्ण करुन घेण्यात आले आहेत. यामुळे या परीक्षेचा निकाल येत्या 25 जानेवारीपर्यंत घोषित करण्यात येणार आहे.
20 डिसेंबर 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार सवलतीचे गुण मिळण्यास विद्यार्थी पात्र ठरतात. परीक्षेच्या निकालाची प्रत केंद्रप्रमुख यांच्याकडे पाठविण्यात येते.