पुणे :– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे रद्द झालेल्या शॉर्टहॅन्डच्या परीक्षा घेण्यास टायपिंग संघटनेने सतत आग्रह धरला होता. अखेर संघटनेच्या पाठपुराव्यामुळे परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला.
परीक्षा परिषदेकडून संगणक, लघुलेखन व टायपिंगच्या परीक्षा होत असतात. करोनाच्या प्रादुभावामुळे परीक्षांचे वेळापत्रकच कोलमडले होते. करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. जुलै मध्ये शॉर्टहॅन्ड व राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील विद्यापीठाच्या परीक्षा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शॉर्टहॅन्डच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परंतु टायपिंग संघटनेचे पुण्याचे हेमंत ढमढेरे, कोल्हापूरच्या अभिलाषा नाईक या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठून परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत रद्द झालेल्या परीक्षा पुन्हा घेण्याबाबतची मागणी केली होती. यावर परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष शरद गोसावी यांनी सकारात्मता दर्शविली होती.
#ImpNews : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद
रद्द झालेल्या परीक्षा महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुन्हा घेण्याचे आश्वासनही परीक्षा परिषदेकडून संघटनेला देण्यात आले होते. त्यानुसार आश्वासनाची अंमलबजावणी करत पुण्यातील केंद्रावर या परीक्षा सुरळीतपणे झाल्या. कोल्हापुर, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिकसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. परीक्षा झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.