तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचा निर्वाळा
चेन्नई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी आज येत्या १६ जानेवारी रोजी दूरदर्शनवर प्रदर्शित होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उपस्थिती लावण्याची सक्ती करण्यात आली नाही असा निर्वाळा केला आहे.
तत्पूर्वी, तामिळनाडू सरकारच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिनांक १६ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेत उपस्थित राहावे असा एक अध्यादेश जारी करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. १६ जानेवारी या दिवशी पोंगल निमित्ताने सुट्टी असताना देखील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती कशासाठी असा प्रश्न डीएमके प्रमुख एम के स्टॅलिन यांनी उपस्थित केला होता.
मात्र आता स्वतः मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे पंतप्रधानांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे अशी कोणतीही सक्ती करण्यात आली नसून ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही उपलब्ध नाही असे विद्यार्थी स्वतःच्या मर्जीने शाळेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पाहू शकतात असा खुलासा त्यांनी केला आहे.