पुणे – महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी बोलविलेल्या बैठकीस पालिकेच्या सर्वच विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडे प्रकरण मार्गी लावण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयांची लाच मागितली जात आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होऊन दोन तीन वर्षे झाली, तरी या कर्मचाऱ्यांना अद्यापही निवृत्ती वेतन सुरू झालेले नाही. परिणामी, अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या लाचखोरीची तक्रार करत असताना कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.
क्लार्क पेन्शन प्रकरणासाठी एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने एकास रंगेहाथ अटक केली आहे. त्यानंतरही पेन्शन प्रकरणांचा ढीग महापालिकेत वाढतच आहे. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीलाही अधिकारी उपस्थित राहत नसल्याने संतप्त झालेले अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सर्व खाते प्रमुखांना तातडीने प्रकरणे निकाली काढून दि. 8 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची कडक सूचना केली आहे.
महापालिकेच्या विविध खात्यातील 564 प्रकरणे प्रलंबित आहेत. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी पूर्वीही एक बैठक घेतली होती. यामध्ये संबंधित खातेप्रमुख, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पगारपत्रक लेखनिक गांभिर्याने सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे हाताळत नसल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाची सुमारे 115, पाणीपुरवठा 41, आरोग्य विभागाकडे 37 प्रकरणे प्रलंबित आहेत. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय 32, ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे 18 तर शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे 19, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे 23 प्रकरणे प्रलंबित आहेत.
सेवानिवृत्त कर्मचारी म्हणतात, “आता संयम संपला…’
“आरोग्य विभागातून मी तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे. घराची जबाबदारी माझ्यावर आहे. आजारपण तसेच इतर कारणास्तव माझी आर्थिक स्थिती बिकट असून मला पैशांची गरज आहे. मी रोज महापालिकेत येत आहे. मात्र, उद्या या, परवा या…असे सांगण्यात येत असून आता माझा संयम संपला आहे. प्रत्येक वेळी टोलवाटोलवी केली जाते,’ अशी कैफियत एका निवृत्त कर्मचारी महिलेने मांडली.