खासदार राऊत : पुण्यात माऊली कटकेंनी घेतली राऊतांची भेट
थेऊर- शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पक्षसंघटन, शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघातील समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी वाघोली येथील समस्या आणि पीएमआरडीएच्या विविध योजनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार राऊत यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करा, असे आदेश दिले आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कटके यांनी शनिवारी (दि.21) सकाळी शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी कटके यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन पीएमआरडीएच्या विविध योजना व कामासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कटके यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कटके यांनी खासदार राऊत यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत पुणे जिल्हा शिवसेना संघटनेसंदर्भात कठोरात्मक निर्णय घेण्यात येतील, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कटके यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला असून या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांच्याशी कटके यांनी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे कटके यांनी विविध प्रलंबित विकासकामाबाबत आग्रही राहणार असल्याचे दिसत आहे.