तहसीलदार रमा जोशी ः घोडेगाव तहसील कार्यालयाशी संपकर साधण्याचे आवाहन
मंचर- संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून दिव्यांगांना त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार लाभ मिळतो. आपल्या गांवातील वाड्या-वस्त्यांवरील कोणतीही दिव्यांग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहु नये, यासाठी त्यांनी घोडेगाव येथील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले.
आंबेगाव तहसील कार्यालय आणि समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, घोडेगाव (ता. आंबेगाव) यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार रमा जोशी बोलत होत्या.याप्रसंगी नायब तहसीलदार अनंता गवारी, डॉ. सचिन कांबळे, डॉ. सीमा डेरे, घोडेगाव मंडलाधिकारी योगेश पाडळे,तलाठी दीपक हरण, विकास खोटे, दीपक करडुले, संजय गायकवाड, योगेश सोनवणे, जानकी बुळे, फिरोज जमादार,बजरंग वाजे, सुनील दरेकर, दीपक ढोबळे उपस्थित होते.
मेळाव्यात सुमारे 101 दिव्यांग व्यक्तींनी आपले अर्ज दिले. दिव्यांग बांधवांच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी एक व्हीलचेअर तहसील कार्यालयाला नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. तहसीलदार रमा जोशी आवश्यक कागदपत्रांची, तसेच विविध योजनांची माहिती यावेळी सांगितली. या मेळाव्यात दिव्यांग बांधवांना अपंगत्व दाखला मिळवून देण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.