PDF । 1992 मध्ये जॉन वॉर्नोक यांनी पहिल्यांदा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट म्हणजेच पीडीएफ चा शोध लावला. त्यातून कुठलीही कागदपत्रे दुसऱ्या व्यक्तीला पाठवणे किंवा शेअर करणे अतिशय सोपे झाले. जॉन वॉर्नोक हे अडोब सिस्टीमचे सहसंस्थापक होते आणि पीडीएफ च्या शोधामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे मागील वर्षी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार हा महान संगणक शास्त्रज्ञ आणि सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक त्यांच्या आप्तस्वकीयांच्या सहवासात असताना त्यांचे निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता आणि त्या विरोधात त्यांचा दोन वर्षे संघर्ष सुरू होता.
1982 साली स्टार्टअप स्थापन करण्यापूर्वी जॉन हे झेरॉक्स कंपनीसाठी काम करत होते. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी डिजिटल उपकरणांसाठी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट म्हणजेच पीडीएफ प्रकारची फाईल अस्तित्वात आणली. त्यामुळे डिजिटल उपकरणांमध्ये कागदपत्रे किंवा मजकूर शेअर करणे अतिशय सोपे झाले.
कोण होते जॉन वॉर्नोक? PDF ।
वॉर्नोक हे सॉल्ट लेक सिटी जवळ असणाऱ्या होलाडे या ठिकाणचे होते. ते गणितामध्ये अतिशय हुशार होते. उटाह विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केला आणि नंतर विद्युत अभियांत्रिकी विषयात पीएचडी संपादन केली. अडोब कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी खाली ठेवल्यानंतर देखील त्यांची उटाह शहराशी अतिशय जवळीक होती. एबीसी न्यूज च्या वृत्तानुसार त्यांचे वडील हे प्रसिद्ध स्थानिक सरकारी वकील होते. ऑलिंपस हायस्कूलमध्ये शिकताना ते अतिशय सर्वसाधारण विद्यार्थी होते. अगदी गणित आणि तत्वज्ञान विषयात पदवी शिक्षण घेत असताना देखील ते सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच होते. मात्र पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेताना त्यांच्यातील चमक सर्वांना दिसून आली.
पीडीएफ चा शोध कसा लावला? PDF ।
त्या काळात डेस्कटॉप प्रिंटिंग म्हणजे अतिशय वेळखाऊ आणि महाग होते. एवढे करूनही ते समाधानकारक नव्हते. लोकांना एकतर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर वापरावा लागे आणि त्यावर पिक्सल स्वरूपात अक्षरे उमटली जात असत. त्यासाठी खूप खर्च येत असे. जागाही जास्त लागत असे. तो प्रिंटर ठेवण्यासाठी आणि त्याखाली कागद ठेवण्यासाठी जागा लागत असे. तेव्हा अमेरिकेत या प्रिंटरची किंमत दहा हजार डॉलर एवढी होती.
वॉर्नोक यांनी डेस्कटॉप प्रिंटर साठी काही प्रोटोकॉल तयार केले आणि मग संगणकाकडून त्या प्रिंटरला अचूक माहिती जाऊ लागली. 1985 मध्ये जेव्हा ॲपलने लेझर राईटर बाजारात आणले तेव्हा त्यामध्ये अडोबचे पहिले पोस्ट स्क्रिप्ट प्रोटोकॉल समाविष्ट होते. काही वर्षातच इंडस्ट्रीमध्ये ते सर्वमान्य झाले.
अडोबने पोस्ट स्क्रिप्टचे लायसेन्स अनेक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्यांना दिले. त्यातून अडोब कंपनी श्रीमंत झाली. 1993 मध्ये कंपनीने ऍक्रोबॅट विकसित केली त्यानुसार पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट किंवा पीडीएफ मध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या फाइल्स या अक्रोबॅट प्रोग्राम द्वारे वाचता येऊ लागल्या.
महाविद्यालयात असल्यापासूनच वॉर्नोक यांना कुठलाही मजकूर किंवा छायाचित्र हे सर्व कॉम्प्युटरवर सारखेच दिसले पाहिजे मग त्या कॉम्प्युटरचे निर्माते किंवा उत्पादक कंपन्या कोणी का असेना, असे वाटत असे. तसेच कुठल्याही प्रिंटरवर हा मजकूर किंवा छायाचित्र सारखेच छापून यावे अशी वॉर्नोक यांची धडपड होती आणि त्यातूनच शेवटी पीडीएफ चा शोध लागला.