मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. क्रूड तेलाच्या किमती 90 हॉलरच्या पुढे गेल्या आहेत. त्यातच रिझर्व्ह बॅंक भांडवल सुलभता कमी करण्याची शक्यता आहे. या तीन कारणांमुळे सोमवारी शेअर बाजारांमध्ये तुफान विक्री होऊन शेअर निर्देशांक पावणेदोन टक्क्यांपर्यंत कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,023 अंकांनी म्हणजे 1.75 टक्क्यांनी कमी होऊन 57,621 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 302 अंकांनी कोसळून 17,213 अंकांवर बंद झाला.
विश्लेषकांनी सांगितले की, परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे निर्देशांक कोसळले. परदेशी गुंतवणूक ज्या कंपन्यात जास्त आहे,
त्या एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसीस, कोटक बॅंक, रिलायन्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट झाली. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2,262 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट या संस्थेचे संशोधक संतोष मीना यांनी सांगितले, की निफ्टी अजूनही 17,200 च्यावर आहे, ही समाधानाची बाब आहे. जर निफ्टी या पातळीच्या खाली गेला तर तो 17,000 अंकापर्यंत खाली कोसळू शकतो. मुख्य निर्देशांकांबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅप 1.3 टक्क्यापर्यंत कोसळले.
व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांकही कोसळले. त्याचा परिणाम युरोपियन आणि आशियाई शेअर बाजारावर झाला असल्याचे जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या पतधोरणानंतर शेअर निर्देशांकांना काही प्रमाणात दिशा मिळू शकेल असे त्यांना वाटते.