मुंबई – इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्यामुळे मंगळवारी देशातील गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तुफान खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक तब्बल अडीच टक्क्यांनी वाढले. विशेष म्हणजे अमेरिका व्याजदरात वाढ करणार असूनही मंगळवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 4,165 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,564 अंकांनी म्हणजे 2.70 टक्क्यांनी वाढून 59,537 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 446 अंकांनी म्हणजे 2.58 टक्क्यांनी वाढून 17,759 अंकावर बंद झाला.
तीन महिन्यात प्रथमच एकाच दिवसात निर्देशांक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुंतवणूकदारानी बॅंकिंग, माहिती तंत्रज्ञान आणि पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली. खरेदीचा जोर इतका होता की सेन्सेक्ससंबंधातील सर्व 30 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स या कंपन्यांनी आजच्या तेजीचे नेतृत्व केले. इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, टाटा स्टील, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांक वाढले.
दरम्यान जागतिक बाजारामध्ये मंदी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊन 102 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आल्या आहेत. काल परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 561 कोटी रुपयांची विक्री केली होती.
आजच्या अनपेक्षित तेजीबाबत बोलताना जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, मुळातच भारतीय अर्थव्यवस्था इतर देशाच्या तुलनेत बळकट आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल असे देशातील तसेच परदेशातील गुंतवणूकदारांना वाटत आहे. मात्र सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक अपेक्षेपेक्षा जास्त असल्याची भावना बऱ्याच गुंतवणूकदाराच्या मनात आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये निर्देशांक अस्थिर राहण्याची जास्त शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. (Stock Market: Storm buying by domestic-foreign investors; The stock market index jumped by two and a half percent)