मुंबई – अर्थव्यवस्था मजबूत असल्याची आकडेवारी जाहीर होत आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश देणे चालूच आहे. त्यातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा लाख कोटींच्या सरकारी पायाभूत सुविधा खाजगी उपयोगासाठी उपलब्ध करणार असल्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही शेअर बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 403 अंकांनी वाढून 55,958 अंकावर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 128 अंकांनी वाढून 16,624 अंकांवर बंद झाला.
आजच्या त्याचे नेतृत्व एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व, टेक महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, स्टेट बॅंकेने केले. मात्र नेस्ले, इन्फोसिस, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
यासंबंधात जिओची वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की जागतिक बाजारात भांडवल सुलभतेमुळे निर्देशांक वाढत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात धातू, बॅंकिंग आणि रिऍलिटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निर्देशांक वाढले. भारतातील लसीकरणाचा वेग वाढला असल्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे गुंतवणूकदारांना वाटते.
काल अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा लाख कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्ता खाजगी कंपन्यांना व्यावसायिक पातळीवर वापरता येणार असल्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे रेल्वे, विमान तळे, रस्ते इत्यादीचा व्यवसायिक वापर वाढणार आहे. आशियाई, युरोपीयन, शेअर बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आले.