मुंबई – रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. मात्र सरलेल्या आठवड्यामध्ये गुंतवणूकदारांनी युध्दाकडे दुर्लक्ष करून बरीच खरेदी केली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांक सरलेल्या आठवड्यात चार टक्क्यांपर्यंत वाढले.
या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,313 अंकांनी म्हणजे 4.16 टक्क्यांनी वाढून 57,863 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 656 अंकांनी वाढून 17,287 अंकांवर बंद झाला. सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे. आता परकीय संस्थागत गुंतवणूकदार काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.
सरलेल्या आठवड्यामध्ये सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. धातू क्षेत्राचा निर्देशांक 5 टक्क्यांनी तर बॅंक निफ्टी 4.7 टक्क्यांनी वाढला. काही गुंतवणूकदार बऱ्याच छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत. एकूण मिडकॅप आणि स्मॉल कॅप दोन टक्क्यानी वाढले. रशिया आणि युक्रेनने परस्परविरोधी भूमिका काही प्रमाणात मवाळ केल्यामुळे क्रुडचे दर कमी होत आहेत, रिझर्व बॅंक सकारात्मक पतधोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. या कारणामुळे निर्देशांकांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते.
सरलेल्या आठवड्यात घडलेली आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. या गुंतवणूकदारांनी या आठवड्यात 1,685 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी चालूच आहे. मार्च महिन्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 41,617 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 31,620 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.