मुंबई – सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारताला कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा करण्याची तयारी इराणने दर्शविली आहे.
यासाठी भारताला डॉलरच्या माध्यमातून इराणला पेमेंट करण्याची गरज नाही. भारताचे चलन रुपया आणि इराणचे चलन रियालच्या माध्यमातून हा व्यवहार करण्याची तयारीही इराणने दर्शविली आहे.
इराणचे भारतातील राजदूत अली चेंगेनी यांनी ही माहिती दिली. जर भारत व इराणने परस्परांच्या चलनाच्या माध्यमातून व्यापार केला तर हा व्यापार वार्षिक पातळीवर 30 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो असे त्यांनी सांगितले. भारत आणि इराण दरम्यान अशा प्रकारचा व्यापार अगोदर चालू होता.
मात्र अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यानंतर हा व्यापार बंद झाला आहे. इराण भारताला मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करीत होता. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे दोन्ही देशाच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. भारत आणि इराणने परस्परांच्या चलनच्या माध्यमातून व्यापार केल्यानंतर तिसऱ्या पार्टीला कमिशन देण्याची गरज नाही. इराण भारताकडून युरिया, पेट्रोकेमिकल, फळे इत्यादी आयात करीत होता. मात्र त्या आयातीवर सध्या परिणाम झाला आहे.
सध्या जागतिक बाजारात क्रुडचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के क्रुड आयात करतो. त्यामुळे भारताच्या आयातीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताची चालू खात्यावरील तूट वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत पर्यायी मार्गाने कमी दरावरील क्रुड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून इंडियन ऑइल कार्पोरेशनने रशियाच्या एका कंपनीकडून 30 लाख पिंप कच्चे तेल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भारताला 25 टक्के सूट मिळाली आहे. निर्बंध घालणाऱ्या देशांनी भारताला पर्याय दिल्यानंतर भारत इतर देशाकडून क्रुडची आयात करणार नाही असे भारताने म्हटले आहे. भारतामध्ये अगोदरच इंधनाचे दर जास्त पातळीवर आहेत. क्रुड महाग झाल्यास आणखी दर वाढवावे लागण्याची शक्यता आहे.