पुणे : शिवाजीनगर ते लोणी काळभोर, हडपसर ते सासवड आणि खडकवासला ते खराडी हे मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएने करावेत, की महामेट्रोने करावेत, याबाबतचा निर्णय “पुम्टा’ समितीमध्ये (पुणे युनिफाइड अर्बन ट्रान्सपोर्ट ऍथॉरिटी) घेतला जाणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट यादरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तारला जाणार आहे.
तर, खडकवासला ते खराडी 28 किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर-पूलगेट, हडपसर आणि लोणीकाळाभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पूलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.
या दोन्ही मार्गांवर येणारा पूलगेट ते हडसपर हा सुमारे 8 किलोमीटर लांबीचा मार्ग एकत्रित असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांकडून याबाबतचा अहवाल मागविण्यात आला असून या अहवालावर “पुम्टा’ समितीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.